Diwali Lakshmi Pujan 2023: ‘असे’ करा लक्ष्मीपूजन; जाणून घ्या शुभ मुहूर्त

Diwali Lakshmi Pujan 2023: ‘असे’ करा लक्ष्मीपूजन; जाणून घ्या शुभ मुहूर्त

हिंदू धर्मीय दीपोत्सव म्हणून दिवाळीचा सण साजरा करतात. दिवाळीच्या सणामध्ये लक्ष्मी पूजन तिन्ही सांजेला करून घरात धनसंपत्ती कायम राहो यासाठी प्रार्थना केली जाते.

हिंदू धर्मीय दीपोत्सव म्हणून दिवाळीचा सण साजरा करतात. दिवाळीच्या सणामध्ये लक्ष्मी पूजन तिन्ही सांजेला करून घरात धनसंपत्ती कायम राहो यासाठी प्रार्थना केली जाते. यंदा 12 नोव्हेंबर दिवशी पहाटे नरक चतुर्दशी आणि संध्याकाळी लक्ष्मीपूजन साजरं केलं जाणार आहे. लक्ष्मी पूजनामध्ये नेमकी ही पूजा कशी आणि कोणत्या वेळी करावी असा प्रश्न तुम्हांला पडला असेल तर जाणून घ्या लक्ष्मी पूजनाचा यंदाचा मुहूर्त काय आहे?

लक्ष्मीपूजन मुहूर्त

12 नोव्हेंबरच्या संध्याकाळी लक्ष्मीपूजन साजरं केलं जाणार आहे. या दिवशी संध्याकाळी 5.59 ते रात्री 8.33 या वेळेमध्ये लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त आहे. सायंकाळी 5.59 ते रात्री 9.11 पर्यंत शुभ आणि अमृत मुहूर्त आहे. रात्री 1.58 ते उत्तर रात्री 3.34 पर्यंत लाभ आणि उत्तर रात्री 5.10 ते ते 6.47 पर्यंत शुभ योग असून या काळात लक्ष्मीपूजन आणि वहीपूजन करावं.

लक्ष्मीपूजन का करतात?

अश्विन वद्य अमावस्येला लक्ष्मी पूजन करण्याची परंपरा आहे. पण तु्म्हाला माहिती आहे का लक्ष्मीपूजन का केले जाते. या दिवशी बलीच्या बंदिवासातून लक्ष्मीची सुटका झाली होती याच आनंदात लक्ष्मीपूजन केले जाते, अशी आख्यायिका आहे.

लक्ष्मीचे वास्तव्य आपल्या घरात नेहमी रहावे, त्यासाठी मनोभावे लक्ष्मीपूजन केले जाते.याच कारणामुळे व्यापारी लोकही यादिवशी त्यांच्या कामाच्या ठिकाणी लक्ष्मीपूजन करतात.

दिवाळी लक्ष्मीपूजन विधी

लक्ष्मीपूजन करताना एक चौरंग घ्यावा. चौरंगावर लाल रंगाचा कपडा घालावा. चौरंगाच्या बाजूला रांगोळी काढावी. चौरंगावर अक्षतांचे अष्टदल कमल किंवा स्वस्तिक काढावे. एक कलश घेऊन त्यात गंगाजल मिसळून घ्यावे. कलशावर नारळ ठेवून त्यात एक आंब्याचे डहाळे ठेवावे. कलशाभोवती फुलांची आरास करावी. कलशाच्या डाव्या बाजूला लक्ष्मीसाठी हळदीने कमलाचे फूल काढून त्यावर लक्ष्मीची मूर्ती स्थापित करावी. लक्ष्मी देवीच्या बाजूला गणपतीची स्थापना करावी. लक्ष्मी देवीजवळ व्यापार संबं‍धित पुस्तक किंवा डायरी, नवीन कॉपी ठेवावी. पूजेचे सामान शुद्ध करण्यासाठी प्रोक्षण करावे. यानंतर लक्ष्मी, गणपती आणि स्थापन केलेल्या अन्य देवतांचे आवाहन करावे. लक्ष्मी मंत्र किंवा 'ॐ महालक्ष्म्यै नम:' मंत्र उच्चारून स्थापन केलेल्या देवतांची पंचामृतासह षोडशोपचार पूजा करावी. यानंतर धूप, दीप, नैवैद्य अर्पण करावा. पूजा झाल्यावर आरती करावी. आरतीनंतर लक्ष्मी देवीला घरात आगमानाची प्रार्थन करावी आणि काही चुकले असल्यास क्षमायाचना करावी.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com