बदलापुरात आला बिबट्या!
बदलापूरच्या कात्रप परिसरात बिबट्याचा वावर आहे असे समजल्यावर मोठी खळबळ उडाली आहे. कात्रपच्या जंगल परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे पुरावे वनविभागाच्या हाती लागले आहेत.
बदलापूर शहराच्या कात्रप परिसराला मौजे शिरगाव, कात्रप पाडा, मोहपाडा असा जंगलाचा भाग आहे. या परिसरात बिबट्याने रविवारी शेळीवर हल्ला केला. या हल्ल्यावेळी शेळीच्या मालकाने बिबट्याला बघितले आणि वनविभागाला याची माहिती दिली. त्यानंतर वनविभागाने या परिसरात येऊन पंचनामा केल्यावर बिबट्याच्या पायांचे ठसे वनविभागाला आढळून आले.
कात्रप जंगल परिसरात नागरिक दररोज मॉर्निंग वॉक, तसंच संध्याकाळी फिरण्यासाठी जात असतात. त्यामुळे नागरिकांनी पुढील काही दिवस या भागात जाऊ नये, असं आवाहन वनविभागाने केलेआहे. याच परिसरात आदिवासी वाड्या सुद्धा आहेत. त्यांनीदेखील अंधारात एकटे घराबाहेर पडू नये, तसेच लहान मुलांनी काळजी घ्यावी, पाळीव जनावरांना गोठ्यात बांधून सुरक्षित ठेवावं, असे आवाहन वनविभागाने केले आहे.
कात्रप जंगल परिसर हा बदलापूर शहरापासून अतिशय जवळ असल्यामुळे भक्ष्याच्या शोधात बिबट्या बदलापूर शहरात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे कात्रप जंगलाच्या जवळपास राहणाऱ्या बदलापूरकरांनी रात्रीच्या वेळी बाहेर पडू नये, असे आवाहन वनविभागाने केले आहे.

