Hair Fall Remedies : केस गळतीवर करा 'हे' घरगुती उपाय
कमकुवत झालेले केस, हार्मोन्समधील बदल, योग्य आहाराचा अभाव, प्रदूषण किंवा हेअर प्रोडक्टचा अतिवापर अशा अनेक कारणांनी केस गळतीची समस्या होत असते. आज आपण यावर काही घरगुती उपाय सांगणार आहोत. ज्याने केस गळण कमी होईल.
1) कांद्याचा रस
कांदा रसात सल्फरचे प्रमाण अधिक असते. यांमुळे टिश्यूतील कोलेजनच्या निर्मितीस मदत होऊन केसांची वाढ होते. यासाठी कांद्याचा रस केसांच्या मुळांशी 10 ते 15 मिनिटांसाठी लावावा. अर्ध्या तासानंतर केस सौम्य शैम्पूने धुवावेत. असे केल्याने केसांची मुळे बळकट होऊन केस गळतीची समस्या कमी होते.
2) कोरपड
आठवड्यातून एकदा दोन चमचे एलोवेरा रस केसांच्या मुळांशी लावून मसाज करावा व अर्ध्या तासानंतर केस धुवावेत. यासाठी आपण ताज्या कोरपडीचा गरही वापरू शकता. यामुळेही केस गळतीची समस्या लवकर कमी होते.
3) भिजलेल्या मेथी बिया
रात्रभर पाण्यात भिजलेले मेथीचे बी बारीक वाटावे व त्याचा लेप केसांना लावून एक तासानंतर केस धुवावेत. हा उपयुक्त उपाय अनेक दिवस केल्यास केस गळतीचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. याशिवाय आहारात मेथी भाजीचा वापर करणेही केसांच्या गळतीवर लाभदायक ठरते. मेथीच्या भाजीचे आरोग्यदायी फायदे जाणून घ्या..
4) जास्वंदाची फुले
जास्वंदाची फुले बारीक कुटून खोबरेल तेलात घालावीत. त्यानंतर हे तेल रात्री झोपण्यापूर्वी केसांना लावावे व सकाळी अंघोळ करताना केस धुवावेत. जास्वंद केसांना पोषण देतात व केस गळती दूर होते.
5) ऑलिव तेल
केस गळतीवर ऑलिव तेलाने केसांना मालिश करणेही उपयोगी ठरते. यामुळे केसांच्या मुळात योग्य प्रकारे रक्ताभिसरण होण्यास मदत होते आणि केसांच्या मुळे अधिक मजबूत करते.
6) भृंगराज तेल
भृंगराज तेलाने मालिश केल्याने केस गळतीची समस्या दूर होते तसेच केस वाढण्यासही मदत होते. भृंगराजमध्ये केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असणारे आयुर्वेदिक गुणधर्म असतात. म्हणूनच अनेक हेअर प्रोडक्टमध्ये भृंगराजचा वापर केला जातो.