मोदींनी लाल किल्ल्यावरून वाजवले 2024 चे बिगुल

मोदींनी लाल किल्ल्यावरून वाजवले 2024 चे बिगुल

24x7 पूर्ण वेळ राजकारण करण्याची भारतीय जनता पक्षाची जाणीवपूर्वक व ठरवून आखलेली रणनीती असली तरीही नरेंद्र मोदींनी त्यात कायमस्वरूपी इलेक्शन मोडमध्ये नेत सुधारणा केली असल्याचे त्यांच्या नेहमीच्या बोलण्यातून स्पष्टपणे जाणवते.
Published by :
shweta walge
Published on

सुनील शेडोळकर, ब्युरो चीफ; 24x7 पूर्ण वेळ राजकारण करण्याची भारतीय जनता पक्षाची जाणीवपूर्वक व ठरवून आखलेली रणनीती असली तरीही नरेंद्र मोदींनी त्यात कायमस्वरूपी इलेक्शन मोडमध्ये नेत सुधारणा केली असल्याचे त्यांच्या नेहमीच्या बोलण्यातून स्पष्टपणे जाणवते. त्यामुळे पंतप्रधान म्हणून बोलतानाही ते आपण चांगले फर्डे वक्ते असल्याचे भासवून संसद असो, निवडणूक सभा असो वा देशाला संबोधण्यासाठी घटनेने दिलेले हक्काचा लाल किल्ला असो कोणत्याही भाषणाला व्यासपीठ मिळताच लोकांशी संवाद साधण्याची विशिष्ट शैली निर्माण केली आहे आणि ती प्रत्येक भाषणागणिक ती विकसित करण्याचे तंत्र अवलंबिले आहे. काॅंग्रेस मुक्त भारत चे अभियान 2013 पासून मोदींनी प्रभावीपणे राबविण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. 2014 आणि 2019 ला काॅंग्रेसला याचा फटका बसलेला असला तरी नरेंद्र मोदींचा चुनावी जुमला लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न काॅंग्रेस करत असून त्याला 2024 मध्ये बरे दिवस यावेत म्हणून गेली काही महिने जिवाचे रान करत असल्याचे चित्र उभारण्यासाठी विरोधकांची मोट बांधली जात असून ही मोळी उचलण्याची क्षमता असणाऱ्या डोक्याचा शोध घेण्यासाठी पाटणा, बंगळुरू नंतर मुंबईत घाट घातला जात असताना काॅंग्रेस बांधत असलेली विरोधकांची मोळी विस्कटण्याची संधी मोदींनी साधली आणि त्यासाठी निवड केली ती लाल किल्ल्याची. वास्तविक पाहता देशाच्या पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून करणाऱ्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणाच्या लोकांच्या कल्पना व अपेक्षा पूर्णपणे वेगळ्या असतात. राष्ट्रांप्रती चेतना जागविणारे विचार असावीत असे पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी व अटलबिहारी वाजपेयी यांची लाल किल्ल्यावरून केलेली भाषणे ऐकल्यावर लोकांचा असा समज होता, पण नरेंद्र मोदींच्या भाषणाची एक वेगळीच शैली लोकांना ऐकावी लागत आहेत. अर्थात पंडित नेहरू, इंदिराजी व अटलजींसारखेच विचार मोदींनींही ऐकवावेत असा नियम नसला तरी पंतप्रधान बोलतायत म्हटल्यावर एक विधिनिषध असतो व तो पाळला जावा अशी सभ्य संस्कृती सांगते, पण मोदींनी आपल्या प्रकटीकरणाची वेगळी कास धरलेली आहे त्यामुळे मोदींना मतदान करणाऱ्यांनाही ती अवघडल्यासारखी वाटत असावी हे निश्चित.

1980 साली जन्म झालेल्या भारतीय जनता पक्षाने अगदी आपल्या सोळाव्या वर्षीच म्हणजे 1996 मध्येच देशाची सत्ता मिळवली होती. सोळावं वरीस धोक्याचं असं सुलोचनाबाई चव्हाण गाण्यातून सांगून गेल्या असल्या तरी वर्तमान राजकीय परिस्थितीत ते भाजपला अगदी चपखल बसते अशी स्थिती आहे. ज्या अटलबिहारी वाजपेयी व लालकृष्ण अडवाणी यांनी भाजपला एका वर्गाच्या मर्यादेपासून सर्व वर्गापर्यंत नेले, सर्वांना सोबत घेण्याच्या भूमिकेनेच महाराष्ट्राला गोपीनाथ मुंडे गवसला अन् भाजपचा चौफेर विस्ताराची सुरुवात झाली. अटलबिहारी पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदींची भारतीय जनता पक्षात एंट्री झाली, अटलबिहारी वाजपेयी यांनी मोदींना गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून बसविण्याचा धोका पत्करला याची मोठी किंमत लालकृष्ण अडवाणी आज मोजत असावेत. डर के आगे जीत है असे एका जाहिरातीतल वाक्य मोदींच्या कार्यशैलीकडे पाहता म्हणता येईल. पंधरा वर्षे गुजरातचे मुख्यमंत्री आणि दहा वर्षे देशाचे पंतप्रधान अशी पंचवीस वर्षे क्रमांक एकचे पद भूषविणारी व्यक्ती सर्वार्थाने परिपक्व असतें असा समज असतो, पण कायम सत्तेची भूक माणसाला स्वस्थ बसू देत नाही असे म्हणतात त्याची अनुभूती मोदींना ऐकल्यावर येते व त्यामुळेच त्यांचे विरोधक व विशेषतः काॅंग्रेस ची डोकेदुखी वाढते. भ्रष्टाचार, परिवारवाद आणि तुष्टीकरण या तीन शब्दांनी काॅंग्रेस ला बेजार करण्याचे मोदींचे धोरण दिसते. काॅंग्रेस मुक्त भारत होणं शक्य नाही हे मोदींनाही माहिती आहे पण तरीही काॅंग्रेस च्या जवळ जाणाऱ्या प्रत्येकाला काॅंग्रेस पासून पळवून लावण्याचे राजकीय तंत्र त्यांनी आत्मसात केले असून ईडी सीबीआय व इनकम टॅक्स या तीन आभूषणांचा यथेच्छ वापर करून ते इतरांना निष्प्रभ करताहेत. राजकारणात सत्ता ही माया जमविण्याचे उपयोगी साधन आहे आणि आघाड्यांचे व युतीचे राजकारण ही तडजोड स्वीकारल्यांनंतरच माया जमविण्याचे वैधानिक अधिकार प्राप्त होतात हे लालूप्रसाद यादव, अखिलेश यादव, नितीशकुमार, उद्धव ठाकरे, शरद पवार, मायावती यांच्याकडे पाहता ते नाकारण्याचे धाडस कुणी करणार नाही आणि पूर्ण बहुमताचा पूर्ण वापर करीत या प्रत्येकाला खिंडीत गाठण्याची संधी सोडलेली नाही.मोदींच्या काळात भ्रष्टाचार होत नसल्याचा दावा खुद्द मोदीही करत नाहीत पण युपीए च्या काळातील भ्रष्टाचारावर ते आजही तुटून पडतात, त्यांनी जेलमध्ये कुणालाही टाकले नाही पण धाक दाखवत आपल्यामागे येण्यास भाग पाडले असे दिल्ली विधेयक राज्यसभेत मंजूर झाल्यानंतर म्हणण्यास जागा आहे.

2024 ची निवडणूक मोदींसाठी सोपी नाही असे निष्कर्ष हाती आल्यानंतर मोदींनी जी जुळवाजुळव सुरू केली आहे त्याकडेही पाहिले पाहिजे. ज्या मणिपूर मुद्द्यावरुन काॅंग्रेस सह सर्व विरोधकांनी रान पेटवले, त्यासाठी विरोधक मणिपूरला जाऊनही आले आणि मोदींनी यावर बोलावे म्हणून अविश्वास ठरावही आणला, पण मोदींनी निवेदन करण्यासाठी त्यांना संसदेत येण्यास भाग तर पाडले पण ऐनवेळी सर्व विरोधक अनुपस्थित राहिल्याने मोदींनी संसदेतूनही राजकीय व्यासपीठ गाजविण्याची संधी साधली. आज लाल किल्ल्यावरून बोलतानाही मणिपूर च्या विषयालाच त्यांनी हात घातला आणि 2024 साठी मतांचा जोगवा मागणारे व लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यागत लाल किल्ल्यावरून आपल्या दहा वर्षांचा हिशेब देतो असे सांगून पुढची संधीही मागण्यास विसरले नाहीत. अचूक टायमिंग साधण्याचे मोदींचे तंत्र विरोधकांनाही बुचकळ्यात पाडते. ज्या सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली विधेयक व राहुल गांधी यांच्या प्रकरणात मोदी सरकारला आरसा दाखविला त्या सर्वोच्च न्यायालयाचे मातृभाषेतून निकाल देण्याच्या भूमिकेचे लाल किल्ल्यावरून सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या उपस्थितीत तोंडभर कौतुक करत कटुता टाळण्याचा प्रयत्न केला. 2024 मध्ये काय होणार हे अजून अनिश्चित असले तरी मोदींनी मोर्चा सांभाळण्याचे पुन्हा एकदा ठरवलेले दिसते आणि त्याची सुरुवात त्यांनी आज लाल किल्ल्यावरून केली. कोणी कितीही गाजावाजा केला तरी ये पब्लिक है, यह सब जानती है, बघूया घोडा मैदान जवळच आहे.

मोदींनी लाल किल्ल्यावरून वाजवले 2024 चे बिगुल
Independence Day : 'वेळेत परत फेड करणारी लोक इथं' कोल्हापूरकरांना असं का म्हणाले अजितदादा?
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com