Sadhguru
SadhguruTeam Lokshahi

सदगुरू वाणी : हिंदू संस्कृती - साधकांसाठी एक चुंबक

एक योगी, द्रष्टा, आत्मज्ञानी आणि प्रसिद्ध लेखक असा लौकिक असलेले सद्गुरू हे भारतातील पहिल्या ५० अतिशय प्रभावशाली व्यक्तींपैकी एक आहेत. सदगुरूंना भारत सरकारतर्फे २०१७ मध्ये ‘पद्मविभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. लोकशाहीच्या वाचकांसाठी सदगुरुंची ही प्रेरणादायी मालिका...
Published by :
Team Lokshahi

भौतिक गरजा भागल्यावरच कोणत्याही संस्कृतीत एखादी आध्यात्मिक प्रक्रिया आकार घेऊ शकते. आपले अन्न, घर, कपडे आणि ते ज्या छोट्याशा सुखसोयींची स्वप्न पाहत आहेत त्या भागल्या की सर्व काही ठीक होईल, असा लोकांचा सुरुवातीला विश्वास असणे स्वाभाविक आहे. जेव्हा या सर्व गरजा भागतात आणि जेव्हा तुम्हाला हे जाणवते की तुम्ही माणूस म्हणून अजूनही परिपूर्ण झालेले नाही, तेव्हा तुम्ही स्वाभाविकपणे अंतर्मुख होता. तसे व्हायचे असेल, तर तुम्हाला अशी सामाजिक आणि सांस्कृतिक परिस्थिती हवी आहे जी दीर्घ काळासाठी शांततापूर्ण आणि प्रस्थापित असेल. हा एक फायदा आहे जो पूर्वी फक्त भारतीय संस्कृतीला होता. इतर सर्व संस्कृती बहुतेक वेळा संघर्ष, युद्ध आणि विजयाच्या शोधात होत्या. त्यामुळे तेथे प्रस्थापित समाज नव्हता. या संस्कृतीमध्ये प्रस्थापित सामाजिक आणि सांस्कृतिक परिस्थिती दीर्घ काळासाठी होती जिथे नैसर्गिकरित्या, लोक भौतिक सुखाच्या पलीकडे त्यांच्या आंतरिक कल्याणाकडे पाहत होते. यामुळे या संस्कृतीने एवढी शक्तिशाली आध्यात्मिक प्रक्रिया विकसित केली. असे लाखो वेगवेगळे मार्ग आहेत ज्याद्वारे तुम्ही तुमच्या अंतिम स्वरूपापर्यंत पोहोचू शकता.

जीवनातील प्रत्येक पैलू अगदी श्वास घेणे, खाणे, बसणे आणि उभे राहणे यासारख्या साध्या गोष्टींमधून या संस्कृतीमध्ये एक आध्यात्मिक प्रक्रिया विकसित झाली. माणसाचा परमोच्च स्वभाव,असं स्वरूप जे भौतिकाच्या पलीकडे आहे त्याचा भरपूर विस्तृतपणे शोध घेतला गेला आहे. त्यातल्या बऱ्याच गोष्टी दुर्दैवाने नष्ट होत आहेत; आपण ते खरोखर जतन करण्यात सक्षम नाही. पण तरीही ती एक जिवंत संस्कृती आहे; हजारों वर्ष जुना एक विशिष्ट धागा अजूनही जतन करण्यात आला आहे. पण तो सामान्य लोकांच्या जीवनात किती स्पंदित होत असेल, ही एक शंकास्पदच गोष्ट आहे; पण एक धागा म्हणून तो टिकून आहे आणि अजूनही अस्तित्वात आहे.

मार्क ट्वेनने ते अगदी सोप्या भाषेत मांडले आहे. त्याला खरोखरच भारतीय गूढवादाची उत्सुकता होती आणि त्याला ते स्वतःला अनुभवून पाहायचे होते, म्हणून तो भारतात आला. त्याच्याकडे एक चांगला मार्गदर्शक होता जो त्याला योग्य ठिकाणी घेऊन गेला. त्याने तीन महिन्यांहून अधिक काळ घालवला आणि जेव्हा तो निघून जात होता तेव्हा तो म्हणाला, ‘मनुष्य किंवा देवाने जे काही करता येईल ते या भूमीत केले गेले आहे.’ अशा प्रकारची छाप त्याच्यावर पडली आणि ते असेच होते. जर तुम्ही डोळे उघडून त्याकडे पाहण्यास तयार असाल, तर मानवी चेतनेच्या संदर्भात जे काही केले गेले आहे ते या ग्रहावर इतर कोठेही घडले नाही.

ही एकमेव अशी संस्कृती आहे ज्यामध्ये कोणत्याही एका धर्माचा समावेश नाही. धर्म आता केवळ बाह्य प्रभावामुळे निर्माण झाले आहेत. अन्यथा संस्कृती म्हणून या भूमीत कोणताही धर्म नाही. आपल्याकडे सनातन धर्म नावाची गोष्ट आहे; याचा अर्थ ‘वैश्विक धर्म’ असा होतो. जेव्हा आपण वैश्विक धर्म म्हणतो, तेव्हा आपण प्रत्येकासाठी एक वेगळा धर्म याबद्दल बोलत नाही आहोत. आपण आपल्या सर्वांचा स्वतःचा धर्म असण्याबद्दल बोलत आहोत. हिंदू ही भौगोलिक ओळख आहे; जो कोणी सिंधूच्या भूमीत जन्माला आला आहे तो हिंदू आहे किंवा सिंधूच्या काठी जिचा उदय झाला अशी संस्कृती म्हणजे हिंदू संस्कृती. म्हणून तुम्ही एका पुरुषाची पूजा करू शकता आणि हिंदू असू शकता, तुम्ही स्त्रीची पूजा करू शकता आणि हिंदू असू शकता, तुम्ही साप किंवा गाय किंवा माकड किंवा खडकाची पूजा करू शकता आणि हिंदू असू शकता. तुम्ही तुमची पत्नी, तुमचा नवरा किंवा तुमच्या मुलाची पूजा करू शकता आणि हिंदू होऊ शकता. किंवा तुम्ही तुमच्या आयुष्यात कोणत्याही गोष्टीची पूजा न करताही हिंदू असू शकता. त्यामुळे ते कोणत्याही विशिष्ट धार्मिक श्रद्धेशी जोडले जात नाही.

हा कोणताही धर्म नाही; ही फक्त एक शक्यता आहे. प्रत्येकजण त्याच्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट करू शकतो. इतर कोणत्याही संस्कृतीने आपल्या भूमीतील लोकांना हे स्वातंत्र्य दिलेले नाही. प्रत्येक संस्कृतीचा असा आग्रह होता की, तिथल्या लोकांनी त्या संस्कृतीत जे काही प्रबळ होते त्या गोष्टीवर विश्वास ठेवला पाहिजे. जर तुमचा यावर विश्वास नसेल, तर तुम्हाला ते स्वाभाविकपणे शत्रू म्हणून संबोधित करायचे किंवा बहिष्कृत करून, एकतर वधस्तंभावर खिळले गेले किंवा खांबावर जाळले गेले किंवा वाळीत टाकले गेले. या भूमीत कोणताही छळ होत नाही कारण कोणाचीही विशिष्ट श्रद्धा प्रणाली नाही. तुमच्या स्वतःच्या घरात नवरा एका देवाची, पत्नी दुसऱ्या देवाची, मुले दुसऱ्या देवाची पूजा करत असतील; काहीच अडचण नाही. प्रत्येक व्यक्ती स्वतःचा मार्ग शोधू शकतो. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, प्रत्येकाने त्याच्या परमोच्च मुक्तीसाठी प्रयत्न केले पाहिजेत.

एक योगी, द्रष्टा, आत्मज्ञानी आणि प्रसिद्ध लेखक असा लौकिक असलेले सद्गुरू हे भारतातील पहिल्या ५० अतिशय प्रभावशाली व्यक्तींपैकी एक आहेत. सदगुरूंना भारत सरकारतर्फे २०१७ मध्ये ‘पद्मविभूषण’पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ते ३.९ अब्ज लोकांपर्यंत पोहोचलेल्या कॉन्शस प्लॅनेट - सेव्ह सॉइल (माती वाचवा) या जगातील सर्वात मोठ्या लोकचळवळीचे संस्थापक देखील आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com