शिवसेनेचा एकला चलो रे चा नारा यशस्वी होईल का?
सुनील शेडोळकर
106 हुतात्म्यांनी होतात्म्य पत्करल्यानंतर संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली. मराठी भाषिकांचे राज्य म्हणून महाराष्ट्राला राजमान्यता मिळाली. पंडित जवाहरलाल नेहरूंच्या हस्ते मंगल कलश घेऊन यशवंतराव चव्हाण मुंबईत आले व तेव्हापासून मराठी लोकांचे राज्य सुरू झाले. 1966 साली बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली शिवसेनेचा राजकीय प्रवास सुरू झाला. यशवंतराव चव्हाण असो, वसंतराव नाईक असो, शंकरराव चव्हाण असो वा शरद पवार कुणीही महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असला तरी मराठी माणसांच्या हक्कासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी कुणाचीही तमा बाळगली नाही. रस्त्यावर उतरून दोन हात करण्याचा बाळासाहेबांचा करारी बाणा आणि त्यांचा करिश्मा आधी मुंबईकरांवर आणि नंतर महाराष्ट्रातील जनतेवर जादू करून गेला. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेने मुसंडी मारत महापालिका ताब्यात घेतल्याने मराठी माणसांसाठी बाळासाहेबांनी सत्तेची दारं उघडली. 1966 ते 2002 पर्यंत बाळासाहेबांनी शिवसेनेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या राजकारणात आपला दबदबा निर्माण केला. सत्तेत असो वा नसो महाराष्ट्राच्या मध्यवर्ती राजकारणातून बाळासाहेबांना बाजूला ठेवून राजकारण करणे काॅंग्रेस सह कोणत्याही विरोधकांना धडकी भरविणारे असायचे. 1989 साली पंतप्रधान असलेल्या विश्वनाथ प्रताप सिंह यांनी मंडल आयोगाच्या शिफारशी स्वीकारल्या अन् भारतीय जनता पक्षाला राजकारणाचे मोठे मैदान मिळाले. 1980 साली जन्म झालेल्या भारतीय जनता पक्षाचे अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी हे दोनच खासदार लोकसभेत होते, पण ध्रुवीकरणाच्या राजकारणाची कास धरत भाजपने आपली एका वर्गापर्यंत ची मर्यादित कक्षा रुंदावत सर्व जातींच्या लोकांना आपलेसे करण्याचे ठरवून राजकारणाचे गणित मांडायला सुरुवात केली. बाबरी मशीद पाडल्यानंतर राम मंदिराचा मुद्दा हा राजकीय मुद्दा बनवून सर्व धर्म समभाव या काॅंग्रेस च्या कार्यशैली विरोधात हिंदू मतदार अशी नवी हाक राजकारणात आणली आणि समविचारी पक्षांची देशभरातील शोधमोहिमेत शिवसेना हा नवा मित्र मिळवला. बाळासाहेब ठाकरेंचे लोकांच्या मनावरील गारुड पाहून अटलबिहारी वाजपेयी, अडवाणी, प्रमोद महाजन व गोपीनाथ मुंडे यांनी शिवसेनेचा लहान भाऊ म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणात शिरकाव केला. बाळासाहेब ठाकरे नावाच्या तुफानाला सोबत घेऊन भाजपने काॅंग्रेससमोर एक सशक्त विरोधी पक्ष म्हणून शिवसेना - भाजप युतीला उभे करण्यात यश मिळविले व 1995 साली महाराष्ट्रात सर्वप्रथम युतीचे सरकार आणले. साधारणतः 2002- 2003 साली उद्धव ठाकरे यांची शिवसेनेत एंट्री झाली. तोपर्यंत शिवसेनेचा व बाळासाहेबांचा उत्तराधिकारी म्हणून राज्य ठाकरे यांनाच प्रोजेक्ट केले गेले व बाळासाहेबांनंतरचा शब्द म्हणून राज यांना पाहिले जायचे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत येण्याने शिवसेनेत नवे वाद उभे राहण्यास सुरुवात झाली.
छगन भुजबळ, गणेश नाईक, नारायण राणे आणि शेवटी राज ठाकरे यांनी शिवसेना सोडल्यानंतर शिवसेना - भाजप युतीची वाटचाल भाजप - शिवसेना अशा वळणावर नेण्याचे भारतीय जनता पक्षाचे मनसुबे हळूहळू दिसू लागले. बाळासाहेब ठाकरेंचे पक्षावर असलेली पकड उद्धव ठाकरे यांना 2007 व 2012 च्या मुंबई महापालिका निवडणुकीत यश मिळवून देण्यासाठी मदतीची ठरली पण त्यानंतर 2013 साली बाळासाहेब गेल्यानंतर च्या परिस्थितीत भाजपने महाराष्ट्रात उचल खायला सुरुवात केली. 2002 च्या गुजरात दंगलीची वेळी गुजरात च्या मुख्यमंत्री पदावरून नरेंद्र मोदींना हटविले जाऊ नये अशी शिष्टाई बाळासाहेब ठाकरे यांनी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कडे केली होती, त्यामुळेच राजकारणातील माझे छोटे भाऊ अशी प्रेमळ साद नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे यांना जाहीर सभांमधून घातल्याचे अनेकदा दिसले. बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाचे ते वैशिष्ट्य होते, पक्षाच्या पलीकडे जाऊन त्यांनी मदत करणारे दातृत्व नेतृत्वा इतकेच जपले. सुनील दत्त काॅंग्रेस चे केंद्रीय मंत्री असूनही त्यांना संजय दत्त ला सोडविण्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांच्या कडे यावे लागले आणि बाळासाहेबांनीही त्याला मदत केली पण त्याची वाच्यता कुठेही केली नाही. त्यामुळेच बाळासाहेबांचे सर्वपक्षीय चाहत्यांची फळी उभारण्यात बाळासाहेबांना व शिवसेनेला यश मिळाले.
नरेंद्र मोदी पंतप्रधान व अमित शहा भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर देशाच्या व राज्याच्या राजकारणात मोठे बदल झालेले दिसून येतात. काॅंग्रेस मुक्त भारत असा नारा देऊन मोदी सत्तेवर आले पण त्यानंतर शतप्रतिशतच्या इच्छेने व ज्या पद्धतीने अमित शहा यांनी निवडणुकीची सूत्रे स्वतः कडे घेतली व जागावाटपा वरुन मित्रपक्षांतील खटके सुरू झाले. 2019 नंतर त्यात मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली दिसते. शिवसेनेची बार्गेनिंग पावर 2014 च्या निवडणूक निकालानंतर शरद पवारांनी कमी केल्याने भारतीय जनता पक्षाचा आत्मविश्वास वाढीस लागण्यास मदत झाली. 2014 ते 2019 सत्तेतील प्रमुख विरोधी पक्ष अशी आपलीं प्रतिमा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निर्माण केल्यामुळे शिवसेना - भाजप मधील अंतर वाढत गेले. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत अमित शहा यांनी उद्धव ठाकरे यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेत समेट घडविला व शिवसेना व भाजप चे तब्बल 42 खासदार निवडून आले. 2014 पेक्षा जास्त खासदार निवडून आल्याने नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान बनले. जो फाॅर्म्युला लोकसभेसाठी अमित शहा यांनी उद्धव ठाकरेंसोबत वापरला तोच विधानसभेसाठी वापरावा म्हणून शिवसेनेवर दबाव आणला आणि लहान भाऊ म्हणून आपले बोट धरणारा भाजप आपल्या खांद्यावर बसू पाहतोय अशी उद्धव ठाकरेंची पक्की धारणा झाली.
2024 च्या विधानसभा निवडणूक निकालानंतर शरद पवार पुन्हा एकदा अॅक्शन मोडमध्ये आले. 2014 साली शिवसेनेची बार्गेनिंग पावर कमी करणाऱ्या पवारांनी संजय राऊत यांना हाताशी घेऊन भाजपला आस्मान दाखवत महाविकास आघाडी तयार करून थेट उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून बसवत काॅंग्रेस ला ही सोबत घेतले. हातातोंडाशी आलेला सत्तेचा घास हिसकावून पवारांनी उद्धव ठाकरे यांना भाजपशी पुन्हा एकदा भिडवले. ज्या बाळासाहेबांनी शिवसेनेचा रिमोट आपल्याकडे ठेवत किंगमेकर च्या भूमिकेत स्वतः ला ठेवले. बाळासाहेबांच्या राजकारणाचे सगळ्यात मोठे यश तेच होते. सत्तेचा कुठलाही अनुभव पाठीशी नसताना शरद पवारांच्या भरवशावर उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी वितुष्ट घेण्याचा धोका पत्करला. सत्ता गेल्यानंतर आजवर छुप्या पद्धतीने भाजपला नामोहरम करणारी भाजप उघडपणे विरोध करण्यासाठी सरसावली. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना बोलताना संयम ठेवला असता तर कदाचित भाजप सोबत त्यांना परत येता आले असते. पण सत्तेचा अनुभव नसल्याने मुख्यमंत्री असूनही उद्धव ठाकरे पक्षप्रमुखाच्या भूमिकेतच राहिले आणि पाहता पाहता देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासन ताब्यात घेत शिवसेनेला विधानसभा सभागृहातून कोंडीत पकडत कुरघोडीच्या राजकारणात शिवसेनेला काॅंग्रेस व राष्ट्रवादी पासून वेगळे पाडले व सरकार पाडून शिवसेनेत मोठी फूट पाडली. दोन वर्षांचा कोविड काळ, उद्धव ठाकरेंचे आजारपण, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचा आक्रमकपणा पुढे शिवसेना निष्प्रभ असल्याचे चित्र पहिल्यांदाच पाहायला मिळाले. 2019 निवडणूक निकालानंतर उद्धव यांनी फोन न उचलणे देवेंद्र फडणवीस यांना जिव्हारी लागले आणि तसे त्यांनी बोलूनही दाखवले. त्यानंतर अजित पवारांना सोबत घेत भाजपने शरद पवारांनाही दोन महिन्यांपूर्वी झटका दिला. शरद पवारांच्या भरवशावर उद्धव ठाकरे यांनी भाजपशी व देवेंद्र फडणवीस यांच्याशी पंगा घेतला पण शरद पवारांचे बेभरवशाच्या राजकारणाने उद्धव ठाकरे यांनी एकला चलो रे चा नारा दिला आहे. राजकारणात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेल्यानंतर कोणती तरी ठोस भूमिका घ्यावी लागते. मोदींना विरोध करणाऱ्या मंडळींमध्ये उद्धव सहभागी झाले आहेत. इंडिया आघाडीची मुंबईतील तिसरी बैठक ही त्यांची लिटमस टेस्ट आहे. जागावाटपाचे सूत्र ठरण्याची शक्यता असताना ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल, नितीशकुमार आणि शरद पवारांच्या मुरलेल्या सत्तेच्या राजकारण्यात उद्धव ठाकरे तसे सौम्य स्वभावाचे भले गृहस्थ वाटतात. त्यांच्याबद्दल लोकांत सहानुभूती ही आहे पण ती इनकॅश करण्यासाठी उद्धव नव्या खांद्याच्या शोधात आहेत. प्रकाश आंबेडकर आणि संभाजी ब्रिगेड यांचे ओझे घेऊन निवडणुकीला सामोरे जायचे का स्वबळावर हुंकार मारायची या विचारात आहेत. हक्काचा भाऊ म्हणून राज ठाकरे फोन उचलतील का असे माध्यमांना विचारणे म्हणजे आग लावणाऱ्यालाच घराकडे जरा लक्ष दे असे सांगण्यासारखे आहे. राज शी घरी जाऊन बोलण्याचे धाडस करावे तर त्यानेही भाजपने टाळी आधीच देऊन ठेवल्याचे सांगितले आहे, त्यामुळे स्वबळावर अग्निपरीक्षा देण्याच्या स्थितीत उद्धव ठाकरे आहेत. असे झाले तर त्यांच्या साठी खरेतर उत्तम संधी आहे, कारण फडणवीस अजित दादा व एकनाथ शिंदे यांना घेऊन अंगावर येणार व शरद पवारांच्या भूमिकेमुळे सावध झालेली काॅंग्रेस किती साथ देईल याचा नेम नाही. त्यामुळे स्वतः च्या बोलण्यावर नियंत्रण ठेवत संजय राऊत यांना गप्प केल्यास राज्यातील सध्याच्या अस्थिर वातावरणाचा फायदा घेणे शक्य आहे. बघूयात उद्धव ठाकरे पक्ष, पक्षचिन्ह, सहकारी, पवारांची खरी साथ गमावल्यानंतर हिमतीने कसे 2024 ला सामोरे जातात. आश्वासक चेहरा अन् लोकांची साथ असल्यास अशक्य असे काहीच नाही. पाहुया उद्धव ठाकरे बाजी उलटवत स्वतःला कसे सिद्ध करतात ......!