शरद पवार रोहित पवारांना प्रोजेक्ट करण्यामागे कारणं काय?

शरद पवार रोहित पवारांना प्रोजेक्ट करण्यामागे कारणं काय?

शरद पवार......! राजकारणातील चाणक्य. राजकारणात वैचारिक भूमिका ठरवून ती जगण्यासाठी प्रवाहाविरुद्ध जात जनमताचा रेटा वळवण्याची क्षमता असणारे महाराष्ट्रातील कदाचित शेवटचे राजकारणी
Published by :
Siddhi Naringrekar

सुनील शेडोळकर

शरद पवार......! राजकारणातील चाणक्य. राजकारणात वैचारिक भूमिका ठरवून ती जगण्यासाठी प्रवाहाविरुद्ध जात जनमताचा रेटा वळवण्याची क्षमता असणारे महाराष्ट्रातील कदाचित शेवटचे राजकारणी.....! एखाद्याला राजकारणातून ठरवून बॅकफूटवर नेण्यात शरद पवारांचा हातखंडा समजला जातो. महाराष्ट्राच्या राजकारणाची खडा न खडा माहिती असणारे शरद पवार राजकारणापली कडील जवळपास सर्वच क्षेत्रांतही आपला दबदबा ठेवणारे व त्यात आवड बाळगणारे चतुरस्र व्यक्तिमत्त्व आहे. देशाचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्यापासून ते सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंतच्या जवळपास प्रत्येक पंतप्रधानांसमवेत सलोख्याचे संबंध निर्माण करणारे देशातील दुर्मिळ राजकारणी म्हणूनही शरद पवारांकडे बघितले जाते. राज्याचे चार वेळा मुख्यमंत्रीपद सांभाळणारे शरद पवार विलक्षण राजकीय चातुर्याचे धनी आहेत. राज्यात असो वा केंद्रात, शरद पवारांची जनसामान्यांशी जोडून असलेली नाळ ही त्यांच्या राजकीय आयुष्याच्या यशाचे गमक आहे. राजकारणात तीव्र मतभेद होऊनही वैचारिक कटुता येऊ न देण्याचे पथ्य शरद पवारांनी नेहमीच पाळले असे त्यांचे राजकीय विरोधकही मान्य करतात. स्वपक्षियांवर किंवा पक्षनेतृत्वावर वेळ प्रसंगी तुटून पडण्याची आक्रमक भूमिका घेताना होणाऱ्या परिणामांची तमा न बाळगता त्यांनी आपली स्पष्ट मते जाहीरपणे व्यक्त करण्यात कोणतीही कसूर ठेवली नाही हे शरद पवारांच्या राजकारणाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. काॅंग्रेस चा वैचारिक पगडा शरद पवारांवर नेहमीच जाणवतो तरीही अनेक वेळा काॅंग्रेस नेतृत्वा विरोधात जाऊन जाहीर भूमिका हे काॅंग्रेसच्या दरबारी दरबारी राजकारणाच्या चौकटीपेक्षा आपली चौकट वेगळी ठेवण्यात शरद पवारांना यश येत गेले. अगदी इंदिरा गांधी, नरसिंहराव व सोनिया गांधी यांच्या काळात पक्ष नेतत्वा विरोधात जाऊन बोलण्याचे धारिष्ट्य करणे हे काॅंग्रेसच्या परंपरेत न बसणारे तरीही काॅंग्रेस ची विचारधारा हीच आपल्या राजकारणाची दिशादर्शक मानून तसे आचरण करणे हे शरद पवारांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हटले जाते. आज राजकारणाचा पोत पूर्णतः बिघडलेला आपण दररोज घडणाऱ्या विविध राजकीय पक्षांच्या बदलत्या भूमिकांबाबत बोलू शकतो. सत्तेसाठी राजकारण व राजकारणासाठी सत्ता हे समीकरण जवळपास सर्वच पक्षांनी मान्य केलेले असले तरी शरद पवारांचे राजकारण हे नेहमीच वेगळ्या धाटणीचे वाटणारे आहे, परिणामी ते विद्रोहाचे किंवा बंडखोरीला राजमान्यता देण्याकडे कलणारे असल्याचा आरोप शरद पवारांवर त्यांच्या विरोधकांनी केलेले आहेत, पण त्याची तमा न बाळगता पुढे जाणे शरद पवारांनी अनेक वेळा पसंत केले. आपण घेत असलेली भूमिका लोकांच्या गळी उतरविण्याचे सामर्थ्य राजकारणात कमी लोकांत असतं, ते राजकारणातील जिगर ही शरद पवारांची लोकांची नाडी परीक्षा ओळखण्याचे प्रभावी माध्यम समजले पाहिजे. याच माध्यामाच्या प्रबलतेमुळे आपल्या राजकीय जीवनात दोन -तीन वेळा काॅंग्रेस मधून बाहेर पडले पण काॅंग्रेसच्या विचारधारेपासून दूर गेले नाहीत. 1999 साली सोनिया गांधींच्या विदेशी असण्याचा मुद्दा शरद पवारांनी उचलल्यामुळे नरसिंहराव, मनमोहनसिंग यासारखे काॅंग्रेसचे दुसऱ्या फळीतील लोकांना देशाचे पंतप्रधान होण्याची संधी मिळाली. शरद पवार जर काॅंग्रेस मध्येच असते तर कदाचित मनमोहनसिंग यांच्या जागी ते पंतप्रधान झालेले महाराष्ट्राने पाहिले असते. काॅंग्रेस पक्ष महाराष्ट्रात वाढविण्यासाठी शरद पवारांनी अनेक मोठमोठ्या विरोधी पक्षनेत्यांशी वैर घेतले. बाळासाहेब ठाकरे यांचे मतदारांवरील असलेले गारुड हे महाराष्ट्रात सर्वश्रुत असतानाही शरद पवारांनी बाळासाहेबांची शिवसेना फोडण्याचे धारिष्ट्य दाखवले ती रग काॅंग्रेस च्या त्या समकालीन सहकाऱ्यांना दाखवता आली नाही.

1999 साली काॅंग्रेस पासून वेगळे होत शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला आणि सलग 15 वर्षे राज्यात व 10 वर्षे केंद्रात आघाडी सरकारसोबत सोबती केली. ही पंचवीस वर्षे शरद पवारांसाठी व राष्ट्रवादी काँग्रेस साठी महत्वाची ठरली. पण अजित पवार यांनी केलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांमधील बंड शरद पवारांना लढण्याचे नवे बळ देणार का? कारण पंचवीस वर्षांपूर्वी चे व आजचे राजकारण यात व्यवहारवादाचा झालेला सर्वात मोठा बदल आहे. भारतीय जनता पक्षाने राजकारणातील नीतिमत्ता संपविल्याचा आरोप मोठ्या प्रमाणावर केला जातो . अजित पवार यांच्यासह 30 - 35 आमदार सत्ताधारी भाजप - शिंदे सरकारमध्ये सामील झाली याचा परिणाम भारतीय जनता पक्षाच्या एकूण राजकारणावर काय होतो याही पेक्षा जास्त तो शरद पवारांपासून वेगळे होणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आणि शिवसेनेपासून वेगळे होणाऱ्या एकनाथ शिंदे आणि त्यांच्या 40 आमदारांवर कसा होतो यावर 2024 चे राजकीय आडाखे अवलंबून आहेत. अजित पवार हे शरद पवारानंतरचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्रातील मुख्य शिलेदार समजले जायचे. महाविकास आघाडी सरकार बनण्याआधीही अजित पवारांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत राजकीय संधान बांधून पाहिले होते. अजित पवारांना शरद पवारांनीच भाजपकडे पाठवले होते हे त्यानंतर अनेक वेळा सिद्ध झाले पण काॅंग्रेस पक्षाला शिवसेनेसोबत येण्यासाठी शरद पवारांनी केलेली ती खेळी होती, कारण शिवसेनेला जातीयवादी पक्षाचे लेबल काॅंग्रेस पक्षानेच लावले होते, त्याच शिवसेनेसोबत सत्ता स्थापनेसाठी सोबत जाण्यास काॅंग्रेस मधील दुसऱ्या फळीतील नेत्यांचा विरोध होता, पण भारतीय जनता पक्षापेक्षा देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पुन्हा होऊ नयेत यावर शरद पवार आणि संजय राऊत यांचे एकमत झाले आणि त्यानंतरच आकडेमोड जमत असल्यामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री केले गेले, त्यात काॅंग्रेस ची फरफट झाली पण शरद पवारांनी डाव साधल्याचा स्पष्ट निरोप भाजपला मिळाला आणि तेव्हापासूनच हे सरकार पाडण्याचे नाना प्रकार झाले. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होण्याआधीही अजित पवारांनी भाजपसोबत जावे अशी इच्छा शरद पवारांकडे व्यक्त केली होती. राज्य सहकारी बँक घोटाळा आणि जरांडेश्वर साखर कारखान्यामुळे अजित पवार केंद्राच्या रडारवर होतेच त्यामुळे भाजप सरकार मध्ये जाण्याची औपचारिकता त्यांनी पूर्ण करुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्ण ताब्यात घेण्याची तयारीही शरद पवारांना धक्का होता.

अजित पवारांची वाढती महत्वाकांक्षा हेही शरद पवारांसमोरील आव्हान होतेच. त्यामुळेच आज सुप्रिया सुळे यांच्या सोबत तिसरी पिढी म्हणून आमदार रोहित पवारांना शरद पवार राजकारणाचे धडे देताना व रोहित पवारही थोरल्या पवारांच्या मुशीत तयार होऊन अजित पवारांना दे धक्का देण्याची रणनीती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आखत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. त्यामुळेच शरद पवार पुन्हा एकदा तरुणांना साद घालीत आहेत. रोहित पवार हे संयमी नेतृत्व म्हणून शरद पवार पुढे आणू इच्छित आहेत. सुप्रिया सुळे या दिल्लीच्या राजकारणात राहणार असल्याचे सांगितले जात आहे तरी पण महाराष्ट्रातील केडर पक्ष सांभाळण्यासाठी सुप्रिया सुळे यांना मदत म्हणून रोहित पवारांना पुढे आणले जात आहे. शरद पवार आज 80 च्या पुढे आहेत. अजित पवारांची पक्ष चालवण्याची आणि कार्यकर्ते हाताळण्याची पद्धत शरद पवारांपेक्षा खूप वेगळी असल्याने व अजित पवार फटकून वागत असल्याने अनेकदा शरद पवारांना मध्यस्थी करावी लागायची. आता अजित पवार वेगळे गेले असल्याने सुंठेवाचून खोकला गेल्याचे मानणारा मोठा गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहे आणि त्यामुळेच पक्ष चिन्ह गेले तरी हरकत नाही पण पक्ष नव्याने उभारण्याची इच्छा शरद पवारांनी व्यक्त केली आहे. सुप्रिया सुळे यांना महाराष्ट्रात मजबूत करण्यासाठीच रोहित पवारांना शरद पवार पुढे आणू पाहात आहेत. त्यासाठी संघर्ष यात्रा काढून तरुणांच्या जास्तीत जास्त जवळ पक्षाला नेण्याची रणनीती शरद पवार आखत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा काका - पुतण्या समोरासमोर येण्याची शक्यता आहे ‌ बघूया पाच राज्यांतील निवडणुकांचा निकाल भारतीय जनता पक्षाला कसा मिळतो यावर महाराष्ट्रातील राजकारणाचे आडाखे बांधले जात आहेत. त्यामुळेच रोहित पवार हे भविष्यात सुप्रिया सुळे यांच्या नंतरचे नेते म्हणून प्रोजेक्ट करण्याची हीच योग्य वेळ समजून गणित मांडायला सुरुवात झाली आहे, बघूया सत्तासंघर्ष कुठपर्यंत जातो......

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com