Pimpri Chinchwad Crime : रात्रीच्या सुमारास तरुणीवर सपासप वार; नेमकं प्रकरण काय?
पिंपरी चिंचवड शहरातील वालेकरवाडी परिसरात एका 18 वर्षीय तरुणीची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास कृष्णाई नगर भागात घडलेल्या या घटनेमुळे आसपासच्या परिसरात खळबळ उडाली आहे.
कोमल भरत जाधव असे या तरुणीचे नाव असून, तिच्यावर दोन अज्ञात व्यक्तींनी धारदार शस्त्राने वार करून तिला गंभीर जखमी केले. गंभीर जखमांमुळे तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला. मारेकरी दुचाकीवर हेल्मेट घालून आले होते. त्यांनी काही क्षणातच तरुणीवर हल्ला करून पळ काढला.
घटनेनंतर परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणीस करण्यात आली असून, आरोपींचे फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहे. त्यावरून हे दोघे घटनास्थळी दुचाकीवरून फिरताना दिसून आले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा नोंदवला आहे.
पोलीस घडलेल्या प्रकरणाची माहिती मिळताच तत्काळ घटनास्थळी दाखल झाले, आणि हत्या का झाली याचा तपास वेगाने सुरू करत आहे. कोमल जाधवच्या मृत्यूनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांकडून आरोपींचा शोध घेण्यासाठी विविध पथके तयार करण्यात आली आहेत. या घटनेने पुन्हा एकदा शहरातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.