Shirdi Crime : शिर्डीत धक्कादायक प्रकार! वाढदिवसाच्या पार्टीसाठी केलं अपहरण अन् पुढे जे झालं ते...

Shirdi Crime : शिर्डीत धक्कादायक प्रकार! वाढदिवसाच्या पार्टीसाठी केलं अपहरण अन् पुढे जे झालं ते...

शिर्डीत सात अल्पवयीन मुलांनी वाढदिवसाची पार्टी करण्यासाठी एका तरुणाचा खून केल्याची घटना समोर आली आहे.
Published by :
Prachi Nate
Published on

शिर्डी परिसरात दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच आता पुन्हा शिर्डी परिसरात एक धक्कादायक आणि अत्यंत गंभीर घटना उघडकीस आली आहे. सात अल्पवयीन मुलांनी एका तरुणाचा खून केल्याची घटना समोर आली आहे. वाढदिवसाची पार्टी करण्यासाठी त्यांनी हा गुन्हा केल्याची माहिती मिळाली असून, पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आोरपी असलेल्या सात अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.

गणेश सखाहरी चत्तर (वय 42) असे मृत व्यक्तीचे नाव असून, ते दिनांक 8 जूनपासून बेपत्ता होते. त्यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर तपास सुरु करण्यात आला. तपासादरम्यान नांदुरखी बुद्रुक परिसरातील ऊसाच्या शेतात एक संशयास्पद मृतदेह आढळून आला. पोस्टमार्टन आणि ओळख पटवल्यानंतर मृतदेह गणेश चत्तर यांचा असल्याचे स्पष्ट झाले.

पोलिस तपासादरम्यान एक महत्वपूर्ण सुगावा हाती लागला. मृत व्यक्तीचा मोबाईल फोन सात अल्पवयीन मुलांनी विकला होता. त्या मोबाईलवरूनच पुढील तपासाची दिशा मिळाली. त्यातील एका मुलाने दुकानदाराला विकलेला मोबाईल पुन्हा स्वतःसाठी घेतल्यावर तो स्विच ऑन केला आणि याच तांत्रिक विश्लेषणाद्वारे सर्व माहिती पोलिसांच्या हाती लागली.

प्राथमिक चौकशीत, या मुलांनी मोबाईल विकून मिळालेल्या पैशांतून वाढदिवसाची पार्टी साजरी केल्याचे समोर आले आहे. हे कृत्य पूर्वनियोजित होते की नाही याचा तपास सुरू आहे. सदर प्रकरणी त्या सात मुलांवर अपहरण आणि खुनाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलीस प्रशासनाकडून या घटनेचा सखोल तपास सुरू असून, अल्पवयीन मुलांच्या वागणुकीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com