Chhatrapati Sambhajinagar Crime : आरडाओरड केला म्हणून वाचला! भरदिवसा छत्रपती संभाजी नगरमध्ये चिमुकल्याच्या अपहरणाचा प्रयत्न
छत्रपती संभाजीनगरच्या मुकुंदवाडी परिसरातील न्यू एसटी कॉलनीत शुक्रवारी (13 जून) दुपाऱ्याच्या वेळेस 7 वर्षांच्या बालकाच्या अपहरणाचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. स्कूटीवर आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी शाळेतून घरी परतणाऱ्या दुसरीच्या विद्यार्थ्याला जबरदस्तीने उचलून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, सतर्कतेने आरडाओरड केल्याने अपहरणकर्त्यांचा डाव फसला आणि परिसरातील नागरिक जागे झाल्यामुळे आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला.
अक्षित अजय सानप असे या विद्यार्थ्याचे नाव असून तो एका शाळेत दुसरीत शिकतो. शाळेचा पहिलाच दिवस असल्याने शनिवारी सायंकाळी 5:30 ऐवजी मुलांना 2:30 वाजता घरी सोडण्यात आले होते. घराजवळच शाळा असल्यामुळे अक्षित एकटाच घरी परतत होता. याचदरम्यान, स्कूटीवरून आलेल्या दोन तरुणांपैकी एकाने त्याला जबरदस्तीने उचलण्याचा प्रयत्न केला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
अक्षितच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. त्याच्या किंकाळ्यांमुळे परिसरातील नागरिक सतर्क झाले आणि बाहेर धावले. नागरिकांना पाहताच अपहरणकर्ते तात्काळ स्कूटीसह फरार झाले. या प्रकरणी अक्षितच्या नातेवाइकांनी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी अज्ञात दोघांविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ही घटना सीरियस अलार्म ठरते. घराजवळ असलेल्या शाळांच्या परिसरात देखील अशी अपहरणाची धाडसी घटना होणे, हे पालकांसाठी चिंतेचे कारण बनले आहे. यापुढे पोलिस आणि शाळा प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी अधिक दक्षता घ्यावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.