Beed : बालविवाहाचा धक्कादायक प्रकार ; बीडमध्ये 13 वर्षीय मुलीचा दोन वेळा विवाह, गुन्हा दाखल
बीड जिल्ह्यात एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे, जिथे अवघ्या पाचवीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीचा एका तासात दोन वेळा विवाह लावण्याचा प्रयत्न करण्यात आला. या गंभीर प्रकरणामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात मुलीच्या दोन्ही नवरदेवांसह त्यांचे नातेवाईक, मुलीचे पालक आणि विवाह लावणाऱ्या काजीसह तब्बल २० ते २२ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर घटना बीड जिल्ह्यातील असून, संबंधित मुलीचे वय केवळ १३ ते १४ वर्षे इतके आहे. जिल्हा बालसंरक्षक अधिकारी अंसारी यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी त्वरीत कारवाई करत गुन्हा दाखल केला. मिळालेल्या माहितीनुसार, पहिल्या नवरदेवासोबत लग्न लावल्याची माहिती मिळताच तो पळून गेला, तर दुसऱ्या नवरदेवासोबत मुलीला घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असताना त्याला अटक करण्यात आली.
पोलिसांनी दोन्ही नवरदेव, त्यांचे कुटुंबीय, मुलीचे आई-वडील, विवाह लावणारे काजी आणि उपस्थित अन्य नातेवाईक यांच्यावर विविध कलमांखाली गुन्हा नोंदवला आहे. एवढंच नव्हे तर विवाहासाठी वापरलेले वाहन देखील पोलिसांनी जप्त केले आहे.
ही घटना केवळ कायद्याचा उल्लंघन नाही, तर बालहक्कांवर मोठा आघात आहे. प्रशासनाकडून कठोर कारवाईचे आश्वासन देण्यात आले असून, या प्रकरणात संपूर्ण तपास सुरू आहे. बालविवाह रोखण्यासाठी अधिक प्रभावी उपाययोजना करण्याची मागणीही आता जोर धरू लागली आहे.