Gautami Patil Pune Crime : पुणे अपघातप्रकरणी चंद्रकांत पाटलांचा थेट DCP ला फोन; गौतमी पाटीलबाबत मोठा निर्णय
पुण्यातील वडगाव बुद्रुक परिसरात घडलेल्या अपघातप्रकरणी नृत्यांगना गौतमी पाटील यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एका भरधाव वाहनाने रिक्षाला जोरदार धडक दिल्यानंतर हे प्रकरण चर्चेत आले असून, त्या वाहनाची नोंदणी गौतमी पाटील यांच्या नावावर असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. याच कारणावरून पोलिसांनी गौतमी पाटील यांना नोटीस बजावली आहे. या अपघातात रिक्षाचालक सामाजी विठ्ठल मरगळे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनेनंतर कोथरूडचे आमदार आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी थेट डीसीपी संभाजी कदम यांना दूरध्वनीवर संपर्क साधत दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे आता पोलिसांच्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अपघातात सहभागी वाहन गौतमी पाटील यांच्या नावावर असल्याने पोलिसांचा तपास अधिक गतीमान झाला आहे.
अपघात 30 सप्टेंबर रोजी मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावरील वडगाव पुलाजवळ झाला. एका हॉटेलसमोर उभी असलेली रिक्षा मागून आलेल्या भरधाव कारने जोरात धडकली. या भीषण अपघातात रिक्षाचालकासह दोन प्रवासी गंभीर जखमी झाले. धडक इतकी तीव्र होती की रिक्षाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून मदतकार्य सुरू केले.
पोलिसांच्या माहितीनुसार, अपघातानंतर कारचालक घटनास्थळावरून फरार झाला होता. मात्र सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी 30 वर्षीय चालकाला अटक केली आहे. प्राथमिक तपासात या चालकाची निष्काळजीपणा हीच अपघाताची कारणीभूत ठरल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, रिक्षाचालक मरगळे यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांवर आरोप केला आहे की, त्यांना पुरेशी मदत मिळत नाही आणि सीसीटीव्ही फुटेजही वेळेवर उपलब्ध करून दिले जात नाही. दुसरीकडे, गौतमी पाटीलच्या टीमकडून या घटनेवर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
राजकीय स्तरावर या घटनेला वेगळे वळण मिळाले असून, काहींनी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर दुहेरी भूमिका घेतल्याचा आरोप केला आहे. निलेश घायवळसारख्या गुन्हेगार प्रकरणांवर मौन बाळगणारे पाटील, मात्र या घटनेत तत्परतेने पुढाकार घेत असल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे.