Devendra Fadanvis On Satara Doctor Suicide : सातारा महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी मुख्यमंत्री अॅक्शन मोडवर! आरोपींवर कठोर कारवाईचे आदेश
सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या महिला डॉक्टरच्या आत्महत्येच्या प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडवली आहे. या घटनेत धक्कादायक बाब समोर आली असून, डॉक्टरने आत्महत्येपूर्वी आपल्या हातावरच मृत्यूस कारणीभूत असलेल्या दोन व्यक्तींची नावे लिहिली असल्याचे उघड झाले आहे. डॉक्टरने या दोघांवर लैंगिक अत्याचार आणि मानसिक छळाचे गंभीर आरोप केले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची माहिती सातारा जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून घेतली असून, संबंधित अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देशही दिले आहेत. त्यानुसार पोलीस अधिकारी गोपाल बदने याला निलंबित करण्यात आले आहे.
सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी सांगितले की, या प्रकरणात पीएसआय गोपाल बदने आणि सामान्य नागरिक प्रशांत बनकर या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना अटक करण्यासाठी दोन स्वतंत्र पोलीस पथके रवाना करण्यात आली असून, तपास जलदगतीने सुरू आहे.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी या घटनेला “अत्यंत संतापजनक” म्हटले आहे. “रक्षकानेच असे अमानुष कृत्य करणे अत्यंत निंदनीय आहे. आरोपींवर कठोरात कठोर कारवाई व्हावी,” असे त्या म्हणाल्या.
दरम्यान, गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांनीही सातारा पोलिसांना तातडीने गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. “या घटनेत जो कोणी दोषी असेल, त्याला वाचवले जाणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला आहे.

