Pune Crime : तक्रारदार निघाला खुनी! मित्राला मारुन पोलिसांना केला फसवा फोनकॉल, पण एक चूक केली अन् भांडाफोड झाला
पुण्यातील हडपसर परिसरातील हांडेवाडी रोडवर एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मैत्रीच्या नात्याला काळीमा फासणारी ही घटना शनिवारी पहाटे उघडकीस आली. रविकुमार शिवशंकर यादव (33) या तरुणाचा खून झाल्याची माहिती पोलिसांना त्याच्या मित्रानेच दिली होती. मात्र तपासात धक्कादायक वळण आलं, जेव्हा तक्रारदार मित्रच खुनी निघाला.
प्राथमिक माहितीनुसार, किसन राजमंगल सहा (20 मूळ गाव मोतीहारी, बिहार) याने रविकुमारसोबत हांडेवाडी रोडवर वास्तव्यास होता. शुक्रवारी रात्री दारूच्या नशेत दोघांमध्ये वाद झाला. रविकुमार झोपल्यावर, किसनने लोखंडी पहाराने त्याच्या डोक्यात घाव घालून त्याचा खून केला. यानंतर पोलिस नियंत्रण कक्षाला फोन करून, “चार जणांनी दुकानातून गादी न दिल्यामुळे मारहाण केली,” असा बनाव तयार करून गुन्ह्याची जबाबदारी अनोळखी व्यक्तींवर ढकलण्याचा प्रयत्न केला.
मात्र पोलिसांनी घटनास्थळाच्या सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता दुचाकीवरून कोणीही आल्याचे दृश्य आढळले नाही. याशिवाय किसनच्या बोलण्यात सतत विसंगती आढळून आल्या. काळेपडळ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या सखोल चौकशीनंतर, पोलिसांनी किसनला ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.