Pune Crime : मध्यस्थीच्या प्रयत्नात जीव गमावला; लोखंडी रॉड मारत पुतण्यानेच केला चुलत्यावर वार
पुणे जिल्ह्यातील चाकण-शिक्रापूर रस्त्यावर असलेल्या बहुळ (ता. खेड) गावात कौटुंबिक वादातून चुलत्याची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वाद सोडवण्यासाठी मध्ये पडलेल्या 62 वर्षीय वृद्धाला पुतण्याने लोखंडी रॉडने छातीत घाव घालून ठार केलं. या घटनेमुळे गावात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.
शुक्रवारी, 6 जून 2025 रोजी हा प्रकार घडला आहे. दशरथ गुलाब पानसरे याने चुलत भाऊ तुकाराम दत्तात्रय पानसरे याच्याशी वाद सुरु असताना लोखंडी रॉडने त्याच्यावर हल्ला केला. तुकारामला हातावर गंभीर दुखापत झाली. वडील दत्तात्रय बाबुराव पानसरे यांनी वाद सोडवण्याचा प्रयत्न केला असता, दशरथने संतापून त्यांच्या छातीत रॉड घालून त्यांची हत्या केली.
घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. हत्येसाठी वापरलेलं शस्त्र जप्त करण्यात आलं असून दशरथ पानसरेला अटक करण्यात आली आहे. तुकारामवर सध्या उपचार सुरू आहेत. गुन्हे विभागाचे पोलिस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरु आहे. या कुटुंबामधील वाद गेल्या काही दिवसांपासून वाढत असल्याचे परिसरातील लोक सांगतात. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण असून स्थानिक नागरिकांनी अशा हिंसक प्रकारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.