Cricket News : लाईव्ह सामन्यात रागाच्या भरात बॅट आपटून तोडली अन्..., पाकिस्तानी खेळाडूवर टीकेचा भडिमार; Video Viral

Cricket News : लाईव्ह सामन्यात रागाच्या भरात बॅट आपटून तोडली अन्..., पाकिस्तानी खेळाडूवर टीकेचा भडिमार; Video Viral

UAE विरुद्ध झालेल्या टी20 मालिकेत पाकिस्तानचा विकेटकीपर-फलंदाज मोहम्मद हारिस संतापाच्या भरात वादग्रस्त वागणूक देताना दिसला.
Published by :
Team Lokshahi
Published on

UAE विरुद्ध झालेल्या टी20 मालिकेत पाकिस्तानचा विकेटकीपर-फलंदाज मोहम्मद हारिस संतापाच्या भरात वादग्रस्त वागणूक देताना दिसला. फलंदाजीत अपयशी ठरल्यानंतर त्याने रागावर ताबा गमावत मैदानातच आपली बॅट जोरात आपटून मोडली. या प्रकाराचा व्हिडिओ काही क्षणांतच सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्याच्यावर चाहत्यांकडून जोरदार टीका सुरू झाली.

शनिवार, 30 ऑगस्ट रोजी शारजाह येथे झालेल्या सामन्यात हारिस केवळ दोन चेंडूत एक धाव करून झेलबाद झाला. UAE च्या गोलंदाज जुनैद सिद्दीकीने टाकलेल्या चेंडूवर त्याने थर्डमॅनकडे शॉट खेळला, मात्र सीमारेषेवर क्षेत्ररक्षकाने सोपा झेल पकडला आणि हारिसला पॅव्हेलियनकडे परतावे लागले. यानंतर मैदानावरच त्याने बॅट आपटून तुकडे केली.

24 वर्षीय हारिस सध्या खराब फॉर्मशी झगडत आहे. मागील आठ डावांत त्याच्या बॅटमधून केवळ 37 धावा आल्या आहेत. त्यामुळे संघ व्यवस्थापनाने दिलेल्या संधीचा तो फायदा घेऊ शकलेला नाही. सततच्या अपयशामुळे आणि संतापजनक वागणुकीमुळे त्याच्यावर अधिक दडपण येत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

हारिसच्या या वागण्यावर पाकिस्तानमधील तसेच इतर देशांतील चाहत्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. क्रिकेटच्या नियमांनुसार खेळातील उपकरणांचा अपमान करणे किंवा जाणीवपूर्वक तोडफोड करणे चुकीचे मानले जाते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) त्याच्यावर दंड किंवा अन्य शिस्तभंगात्मक कारवाई करू शकते.

या घटनेमुळे पुन्हा एकदा पाकिस्तान क्रिकेटमधील खेळाडूंच्या वर्तणुकीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. केवळ कौशल्य नव्हे, तर मैदानावर शांतता आणि शिस्त राखणेही आंतरराष्ट्रीय खेळाडूसाठी तितकेच महत्त्वाचे असल्याचा हा प्रकार ठळक संदेश देऊन गेला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com