Vaishnavi Hagawane Case : वैष्णवी हगवणे प्रकरणात नवे धक्कादायक खुलासे; 29 जखमा आढळल्या
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक बाब समोर आली आहे. आत्महत्येच्या आदल्या दिवशी तिला सासरच्या लोकांकडून जबर मारहाण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तिच्या शरीरावर तब्बल 29 जखमा आढळल्या असून, त्यापैकी 15 जखमा 24 तासांमध्ये झाल्याचे डॉक्टरांनी नमूद केले आहे.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी न्यायालयात तपशील मांडत पती शशांक हगवणे, सासू लता हगवणे आणि नणंद करिष्मा हगवणे यांच्या पोलीस कोठडीत 28 मेपर्यंत वाढ करण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. पी. खंदारे यांनी दिले. दरम्यान, या प्रकरणात वैष्णवीच्या सासऱ्याला आणि दीराला आश्रय देणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात आली आहे. काँग्रेसचे आमदार वीरकुमार पाटील यांचे पुत्र प्रीतम पाटील यांच्यासह आणखी चौघांना अटक करण्यात आली आहे. हे सर्वजण आरोपींना लपवण्यास मदत करत असल्याचा आरोप आहे.
तपासादरम्यान, पोलिसांनी आरोपींकडून पाईप जप्त केला असून, त्याचाद्वारे वैष्णवीला मारहाण झाल्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे, हुंड्यात मिळालेली महागडी मोटार, चांदीची भांडी, दोन पिस्तुले आणि दुचाकी जप्त करण्यात आली आहे. आरोपींची पाच बँक खाती गोठवण्यात आली असून, 51 तोळे सोनं तारण ठेवल्याची माहितीही समोर आली आहे. या दागिन्यांची चौकशी आवश्यक असल्याने सरकारी वकील नितीन अडागळे यांनी पोलिस कोठडी वाढवण्याची मागणी केली होती, जी न्यायालयाने मान्य केली.