Kandivali Fraud
SHANTILAL MEHTA FAMILY ACCUSED OF 5.10 CRORE ONLINE GOLD AND DIAMOND INVESTMENT SCAM

Kandivali Fraud: कांदिवलीतील सराफ व नातेवाईकांविरोधात ५.१० कोटींची फसवणूक; गुन्हा दाखल

Gold Diamond Fraud: कांदिवलीतील सराफ शांतिलाल मेहता आणि नातेवाईकांवर ५.१० कोटींची फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल. सोने व हिऱ्यांच्या ऑनलाइन ट्रेडिंगमध्ये गुंतवणूकदार फसले.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

कांदिवलीतील एका सराफाने पत्नी, वडील आणि नातेवाईकांच्या मदतीने सोने व हिऱ्यांच्या ऑनलाइन व्यापारात गुंतवणुकीचे आमिष दाखवून ५२ वर्षीय व्यापारी तसेच त्याच्या मित्रांची ५.१० कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कास्तुरबा मार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपींवर भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४), ३१६(२), ३५१ आणि ३(५) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, जानेवारी २०२३ मध्ये मुख्य आरोपी शांतिलाल मेहता आणि त्यांची पत्नी मुक्ता मेहता यांनी तक्रारदार तिवारी यांना त्यांच्या 'मोनिका ज्वेलरी' या दुकानात बोलावले. तेथे सोने, चांदी व हिऱ्यांच्या ऑनलाइन कमोडिटी ट्रेडिंग व्यवसायात गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करत किमान ४० टक्के परताव्याचे आश्वासन दिले. या आमिषापायी तिवारी यांनी मित्र पराग मालदे व कमल पारेख यांच्यासोबत मिळून ७० लाख रुपये रोख तसेच ४.४० कोटी रुपयांचे सोने व हिऱ्यांचे दागिने गुंतवले.

मात्र ऑक्टोबर २०२५ पर्यंत परतावा न मिळाल्याने चौकशी केली असता आरोपी टाळाटाळ करू लागले. दुकानात गेल्यावर आरोपींच्या वडिलांनी हिशेब पूर्ण करण्याचे आश्वासन दिले, पण त्यानंतरही पैसे किंवा दागिने परत न मिळाल्याने तक्रारदारांनी पोलिसांत फिर्याद दिली. या प्रकरणाचा पुढील तपास कास्तुरबा मार्ग पोलीस करीत आहेत.

या फसवणुकीप्रकरणाने गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे आणि ऑनलाइन ट्रेडिंग व्यवसायातील जोखमींबाबत जनजागृतीची गरज अधोरेखित झाली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com