Mumbai Crime: मुंबई हादरली! लोकल रेल्वे स्थानकावर धारदार शस्त्राने केला हल्ला, प्राध्यापकाचा जागीच मृत्यू
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
पश्चिम रेल्वेवरील मालाड रेल्वे स्थानकात शनिवारी सायंकाळी ६ च्या सुमारास लोकलमधून उतरताना झालेल्या भांडणानंतर ३३ वर्षीय प्राध्यापकावर धारदार शस्त्राने हल्ला करून त्यांची हत्या करण्यात आली. ही घटना डोंबिवली येथे राहणारे आलोक कुमार सिंग यांच्याबाबत घडली. ते विलेपार्ले येथील एका महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. हल्लेखोर घटनास्थळावरून पळून गेला असून, बोरिवली रेल्वे पोलिसांनी त्याचा शोध घेण्यासाठी शोधमोहीम सुरू केली आहे.
चर्चगेट-बोरिवली धीम्या लोकलमधून प्रवास करत असताना आलोक कुमार सिंग आणि हल्लेखोर यांच्यात वाद झाला. मालाड स्थानकात उतरल्यानंतर हा वाद टोकाचा झाला. संतापलेल्या हल्लेखोराने खिशातून धारदार शस्त्र काढून सिंग यांच्या पोटाच्या उजव्या बाजूला वार केला. यात सिंग यांना गंभीर दुखापत झाली आणि ते फलाटावर कोसळले. प्रत्यक्षदर्शींनी तात्काळ मदत मागवली आणि त्यांना शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
बोरिवली रेल्वे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. लोहमार्ग पोलिस पश्चिम परिमंडळाच्या पोलीस उपायुक्त सुनीता साळुंके-ठाकरे यांनी सांगितले, की फरार हल्लेखोराचा शोध सुरू आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींच्या मदतीने लवकरच आरोपीला पकडले जाईल. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे आणि रेल्वे पोलिसांनी सुरक्षा वाढवली आहे.
• मालाड रेल्वे स्थानकात लोकलमधील वादानंतर प्राध्यापकाची हत्या
• धारदार शस्त्राने पोटावर वार; उपचारादरम्यान मृत्यू
• आरोपी घटनास्थळावरून फरार, पोलिसांची शोधमोहीम सुरू
• घटनेनंतर प्रवाशांमध्ये भीती, रेल्वे सुरक्षेत वाढ
