Mamata Banerjee On West Bengal Rape Case : "असचं चालू राहिलं तर, मी आता पत्रकारांना भेटणार नाही" सामूहिक बलात्कारावरील टिप्पण्यांनी वेढलेल्या ममता बॅनर्जी असे का म्हणाल्या?
पश्चिम बंगालमध्ये खासगी वैद्यकीय महाविद्यालयातील एका विद्यार्थिनीवर महाविद्यालयाच्या आवाराबाहेरच तीन अनोळखी व्यक्तींनी सामूहिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला होता. पश्चिम बंगालमधील दुर्गापूर येथील नुकत्याच झालेल्या एका वैद्यकीय विद्यार्थिनीवर झालेल्या सामूहिक बलात्कारामुळे ममता बॅनर्जी यांच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
यावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी एक विधान केलं होत. ज्यामुळे त्या चर्चेत आल्या असून त्यांनी केलेल्या विधानाला देशभरातून नाराजी व्यक्त करत विरोध केला गेला. यावर ममता बॅनर्जी यांनी पुन्हा प्रत्युत्तर देत माध्यमांनी त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला आहे त्यामुळे मी आता पत्रकारांना भेटणार नाही असं विधान केलं.
रविवारी माध्यमांशी बोलताना त्या म्हटल्या की, "मी झालेल्या घटनेवर जे वक्तव्य केलं त्याच्या माध्यमांनी वेगळा अर्थ दाखवत तो लोकांपर्यंत पोहचवला. हे खूप दुर्दैवी आहे आणि जर हे असेच चालू राहिले तर मी आता पत्रकारांना भेटणार नाही. मुद्दाम तुम्ही एखाद्या वक्तव्याचा अर्थ लोकांपर्यंत चुकीचा पोहचवत असाल तर याला पत्रकारिता म्हणत नाही. जर मी म्हणालो की मी भात खातो, तर याचा अर्थ असा नाही की मी भात आहे. माझ्यासोबत हे राजकारण खेळू नका", असं म्हणत ममता बॅनर्जी यांनी पत्रकारांवर संताप व्यक्त केला.
ममता बॅनर्जी यांनी नेमकं कोणतं विधान केलं होत?
उत्तर बंगालला रवाना होण्यापूर्वी कोलकाता विमानतळावर माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या की, "मुलींनी रात्री उशिरा बाहेर जाणे टाळावे. मुलगी एका खाजगी वैद्यकीय महाविद्यालयात शिकत होती. तिने पत्रकारांना सांगितले की, रात्री 12:30 वाजता ती कशी बाहेर आली? माझ्या माहितीनुसार, हे जंगली भागात घडले. चौकशी सुरू आहे. या घटनेने मला धक्का बसला आहे, परंतु खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांनीही त्यांच्या विद्यार्थिनींची काळजी घेतली पाहिजे."