Vaishnavi Hagawane Case Update : अखेर वैष्णवी हगवणे प्रकरणातील फरार आरोपी निलेश चव्हाणला नेपाळमधून अटक
वैष्णवी हगवणे प्रकरणातील मृत्यूप्रकरणी फरार असलेला मुख्य आरोपी निलेश चव्हाण याला अखेर शुक्रवार, दिनांक 30 मे 2025 रोजी नेपाळमधून अटक करण्यात आली आहे. तो मागील आठवड्यापासून फरार होता. पिंपरी-चिंचवड पोलिसांची चार पथकं आणि पुणे पोलिसांची तीन पथकं निलेश चव्हाणचा शोध घेत होती. या पथकांनी महाराष्ट्रासह विविध राज्यांमध्ये शोधमोहीम राबवली होती. या तपासात तांत्रिक पुरावे, कॉल डिटेल्स आणि सीसीटीव्ही फुटेजचा वापर करून आरोपीच्या हालचालींचा मागोवा घेतला गेला.
अखेर, गोपनीय माहितीच्या आधारे निलेश चव्हाण याचा नेपाळमध्ये ठावठिकाणा लागला आणि स्थानिक यंत्रणांच्या मदतीने त्याला ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी त्याची रवानगी भारतात करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली असून लवकरच त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.
पोलिस आयुक्तालयाने या यशस्वी अटकेबद्दल तपास पथकाचे कौतुक केले असून, कस्पटे कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले आहे.