Sushma Andhare On Satara Doctor Case : "तिच्या पत्रात अनेक गंभीर संकेत" सातारा डॉक्टर मृत्यू प्रकरणात सुषमा अंधारे आक्रमक

Sushma Andhare On Satara Doctor Case : "तिच्या पत्रात अनेक गंभीर संकेत" सातारा डॉक्टर मृत्यू प्रकरणात सुषमा अंधारे आक्रमक

सातारा जिल्ह्यातील महिला डॉक्टरच्या रहस्यमय मृत्यू प्रकरणावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
Published by :
Prachi Nate
Published on

सातारा जिल्ह्यातील महिला डॉक्टरच्या रहस्यमय मृत्यू प्रकरणावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या आत्महत्येच्या प्रकरणात भाजपाचे नेते व माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांची नावं घेतली जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे. याच संदर्भात त्यांनी वर्षा आणि हर्षा हगवणे या दोन तरुणींच्या प्रकरणाचा उल्लेख करून आरोपांची मालिका सुरू ठेवली आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना अंधारे यांनी सांगितले की, "स्वतःच्या भूमिकेला आधार नाही, असे म्हणणाऱ्यांनी डॉक्टर महिलेने लिहिलेली पत्रे पाहावीत. आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी डॉ. अंशुमन धुमाळ यांना दिलेल्या पत्रांत अनेक गंभीर संकेत असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच या प्रकरणात एपीआय झायपात्रे, पीएसआय पाटील, डॉ. धुमाळ तसेच निंबाळकरांचे दोन्ही पीए आणि स्वतः निंबाळकर यांची तपासात चौकशी व्हावी", अशी मागणी त्यांनी पुन्हा अधोरेखित केली.

"निंबाळकर यांनी राजकीय ताकदीचा वापर करून विविध व्यक्तींवर खोट्या तक्रारींमार्फत दबाव आणल्याचा आरोपही अंधारे यांनी केला. वर्षा आणि हर्षा हगवणे या दोघींनी आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये देखील निंबाळकर यांचा उल्लेख असल्याचे" त्यांनी पत्रकारांसमोर वाचून दाखवले.

यावेळी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावरही त्यांनी कठोर टीका केली. सातारा डॉक्टर प्रकरणात चारित्र्यहननाचे वक्तव्य महिलांसाठी अयोग्य असल्याचे सांगत, हगवणे बहिणींच्या प्रकरणात मात्र चाकणकर शांत का राहिल्या? असा सवाल उपस्थित केला.

निंबाळकर यांनी त्यांच्यावर दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या दाव्याला उत्तर देताना अंधारे म्हणाल्या, “मी दररोज समोर येऊन पुरावे मांडणार, घाबरणार नाही.” त्यामुळे या प्रकरणातील पुढील घडामोडींवर राज्याचे लक्ष केंद्रीत झाले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com