Raigad : धक्कादायक! वंशाच्या दिव्यांनी घेतला आईबापाचा जीव; कारण ऐकून उडेल संताप
थोडक्यात
म्हसळा तालुक्यातील मेंदडी गावात घडलेल्या दुर्दैवी घटना घडली.
अंगावर काटा आणणाऱ्या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे.
घरखर्च न देणे आणि घरात राहू न देण्याच्या वादातून स्वतःच्या आईवडिलांची हत्या केली.
(Crime In Maharashtra) म्हसळा तालुक्यातील मेंदडी गावात घडलेल्या दुर्दैवी आणि अंगावर काटा आणणाऱ्या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. घरखर्च न देणे आणि घरात राहू न देण्याच्या वादातून स्वतःच्या आईवडिलांची हत्या करणाऱ्या दोन मुलांना पोलिसांनी अटक केली आहे. वृद्ध दाम्पत्य महादेव कांबळे (70) आणि विठाबाई कांबळे (65) यांचे कुजलेल्या अवस्थेत मृतदेह त्यांच्या राहत्या घरातून आढळल्यानंतर उघडकीस आलेल्या या प्रकरणाने मानवी नात्यांची मर्यादा कुठपर्यंत ढासळू शकते, याचे धक्कादायक उदाहरण समोर आले आहे.
दोन दिवसांपासून घरातून विचित्र दुर्गंधी येत असल्याचे लक्षात आल्यानंतर शेजाऱ्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. म्हसळा पोलिसांनी गुन्हे शाखेच्या मदतीने घटनास्थळी धाव घेतली. सुरुवातीला हा नैसर्गिक मृत्यू की आत्महत्या याबद्दल संभ्रम असला, तरी मृतदेहांची स्थिती आणि घरातील परिस्थिती पाहता पोलिसांना खुनाचा संशय आला. तपास अधिक गतीने सुरू करत अवघ्या 24 तासांतच पोलिसांनी आरोपी मुलगे नरेश कांबळे आणि चंद्रकांत कांबळे यांना ताब्यात घेतले.
चौकशीत दोन्ही मुलांनी गुन्ह्याची कबुली देत धक्कादायक माहिती उघड केली. घरखर्च देत नाहीत आणि घरात राहू देत नाहीत, याच्या रागातून त्यांनी आईवडिलांना ठार केल्याची कबुली मुलांनी दिली. रागाच्या भरात रात्रीच घरात प्रवेश करून दोघांवर हल्ला करण्यात आला. त्यानंतर मृतदेह घरातच ठेवून आरोपी फरार झाले.
घटनेची माहिती समोर आल्यानंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून गावकऱ्यांमध्ये तीव्र संताप आहे. पोटच्या लेकरांनीच पालकांचा काटा काढल्याच्या या घटनेनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. गावकऱ्यांनी आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी केली आहे. म्हसळा पोलिस ठाण्याचे अधिकारी आणि स्थानिक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येणार असून घटनेमागील आणखी कारणांचा शोध पोलिस घेत आहेत.

