Rohit Arya Case : केसरकरांमुळे रोहित आर्याचा जीव वाचला असता! पण त्याच्यासोबत संपर्क साधण्यास नकार दिल्याचा पोलीस अधिकाऱ्याचा दावा
मुंबईतल्या गजबजलेल्या पवई परिसरामध्ये रोहित आर्य नावाच्या व्यक्तीनं आपल्या प्रलंबित मागण्या महाराष्ट्र शासनाकडून पूर्ण होत नसल्याच्या कारणावरून काही मुलांना ओलीस धरण्याचा थरारक घटनाक्रम सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.
पवईमध्ये ऑडिशनला बोलावून 17 मुलांना ओलिस ठेवणाऱ्या रोहित आर्य या व्यक्तीचा मुंबई पोलिसांनी एन्काऊंटर केला. दरम्यान या एन्काऊंटरप्रकरणी आता अनेक खुलासे समोर येत असताना पोलिसांच्या कारवाईवर ही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. अशातच या प्रकरणी पोलीस अधिकाऱ्याचा दावा चर्चेता आला आहे.
30 ऑक्टोबर रोजी पवईतील एका स्टुडिओमध्ये आर्थिक व्यवहाराशी संबंधित मागण्यांसाठी 17 अल्पवयीन मुलांसह 19 जणांना रोहित आर्या याने ओलीस ठेवले होते. शिक्षण विभागात केलेल्या कामाच्या थकबाकीसाठी त्याने अल्पवयीन मुलांना ओलीस ठेवल्याचं पोलिसांना सांगितले होते.
तीन तासांच्या ओलीसनाट्यादरम्यान त्याच्या मागण्या ऐकुन घेण्याकरिता डीसीपी अधिकाऱ्याने रोहित आर्याचा माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यासोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.
मात्र, दीपक केसरकर यांनी रोहित आर्यासोबत संपर्क साधण्यास नकार दिल्याचं वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. यानंतर केसरकरांनी याविषयी बोलताना सांगितले की, "आर्याने थकबाकीबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी बोलले पाहिजे, असे सांगून मी त्याच्याशी बोलण्यास नकार दिला. मला कल्पना नव्हती, की हे प्रकरण इतके गंभीर होईल"

