West Bengal News : अत्याचार, गर्भपात आणि धमकी...पद्मश्री पुरस्कार विजेत्या स्वामींवर महिलेनं केले गंभीर आरोप, म्हणाली...
पश्चिम बंगालमधून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली असून, भारत सेवाश्रम संघाचे साधू आणि यंदाचे पद्मश्री पुरस्कार विजेते कार्तिक महाराज यांच्यावर एका महिलेने 12 वेळा बलात्कार केल्याचा गंभीर आरोप केला आहे. या आरोपामुळे राज्यात सामाजिक आणि राजकीय पातळीवर मोठी खळबळ उडाली आहे. तक्रारकर्त्या महिलेच्या म्हणण्यानुसार, ही घटना 2013 सालची आहे. महाराजांनी तिला नोकरीचे आमिष दाखवून मुर्शिदाबाद येथील आश्रमात बोलावले.
तिथेच एका शाळेत शिक्षिकेची नोकरी मिळवून देतो, असे सांगत तिच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली. मात्र, त्याच काळात जानेवारी ते जून 2013 दरम्यान महाराजांनी तिच्यावर किमान 12 वेळा लैंगिक अत्याचार केल्याचा तिचा आरोप आहे. पीडितेने सांगितले की, महाराजांनी तिला पोलिसांकडे गेली तर आत्महत्या करण्याची धमकी दिली होती. त्यामुळे ती भीतीपोटी अनेक वर्षे गप्प राहिली. अखेर आता तिने धैर्य दाखवत पोलिसांत तक्रार दिली आहे.
कोलकाता पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला असून, तपास सुरू केला आहे. दरम्यान, कार्तिक महाराजांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत. “मी एक संन्यासी आहे. संन्यासाच्या मार्गावर अशा अडचणी येत असतात. माझी कायदेशीर टीम याला न्यायालयात उत्तर देईल,” असे त्यांनी म्हटले आहे. तसेच, आश्रमात महिलेच्या राहण्याची व्यवस्था होती, हे कबूल करत त्यांनी तिच्या आरोपांमागे राजकीय हेतू असल्याचे सूचित केले. हे प्रकरण अशा वेळी उघडकीस आले आहे जेव्हा कार्तिक महाराज आणि सत्ताधारी तृणमूल काँग्रेस यांच्यात तणाव निर्माण झाला आहे.
काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी महाराजांवर भाजपला निवडणुकीत पाठिंबा दिल्याचा आरोप केला होता. यानंतर महाराजांनी तृणमूलवर कायदेशीर नोटीस पाठवली होती, ज्यात त्यांनी आपल्या आश्रमाची प्रतिमा मलिन केल्याबद्दल बिनशर्त माफीची मागणी केली होती. सध्या हे प्रकरण सामाजिकच नव्हे तर राजकीयदृष्ट्याही चांगलेच गाजत असून, पोलीस तपासानंतर खरे काय आणि खोटे काय, हे स्पष्ट होईल. दरम्यान, सोशल मीडियावर या प्रकरणावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.