Shocking News : नाशिक बालविक्री प्रकरणात धक्कादायक उघड, जन्माआधीच मुलीचा बाप बदलल्याचा आरोप
नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बरड्याची वाडी येथे उघड झालेल्या बालविक्री प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात प्रशासनाने तातडीने कारवाई करून ९ लहान मुलांना ताब्यात घेतले असून विष्णू हंडोगे आणि बच्चूबाई हंडोगे यांना अटक केली आहे. ताब्यात घेतलेल्या सर्व मुलांची वैद्यकीय तपासणी सुरू आहे.
काय आहे प्रकरण?
बरड्याची वाडी येथे काही मुलांना ‘दत्तक’ देण्याच्या नावाखाली प्रत्यक्षात विक्री केली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर प्रशासनाने तातडीने तपास सुरू केला. चौकशीत ६ मुलगे आणि ३ मुली अशा ९ मुलांना ताब्यात घेऊन नाशिकच्या निरीक्षणगृहात ठेवण्यात आले. कथित दत्तक पालकांना देखील पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले.
जन्माआधीच मुलीचा बाप बदलला?
या प्रकरणात आता गंभीर आरोप समोर आले आहेत. एल्गार कष्टकरी संघटनेने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत महत्त्वाची कागदपत्रे सादर केली आहेत.
संघटनेचा आरोप असा आहे की,
गर्भवती महिलेचे आरोग्य कार्ड कथित दत्तक पालकाच्या नावावर बनवण्यात आले. म्हणजे मुलगी जन्मण्यापूर्वीच तिचा ‘बाप’ बदलला, असा गंभीर आरोप संघटनेने केला आहे. तसेच अंगणवाडी सेविकांनी जन्मदाखला दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर तयार केल्याचा आरोपही आहे.
१०० रुपयांच्या स्टँपवर ‘दत्तकपत्र’
संघटनेने आणखी एक धक्कादायक दावा केला आहे.
दत्तकपत्रासाठी अधिकृत तहसीलदाराची सही आवश्यक असते. मात्र या प्रकरणात फक्त १०० रुपयांच्या स्टँपवर साध्या कागदावर सह्या करून दत्तकपत्र तयार करण्यात आले. त्यामुळे या दत्तकपत्रांची वैधताच नसल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.
संघटनेचा आरोप आहे की हे प्रकरण केवळ एका मुलाचे नाही, तर अनेक मुलांची नियोजनबद्ध विक्री करण्यात आलेली आहे. काही शिक्षकांनी शाळेचे दाखले देऊन या प्रक्रियेला मदत केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
प्रशासनाचा कसून तपास
प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी समिती गठीत केली आहे. समितीचे सदस्य बरड्याची वाडी येथे पोहोचून संबंधित महिलेकडून आणि गावकऱ्यांकडून माहिती घेत आहेत. अजून कोणते नवे तपशील समोर येतात, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
थोडक्यात
नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बरड्याची वाडी येथे उघड झालेल्या बालविक्री प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
या प्रकरणात प्रशासनाने तातडीने कारवाई करून ९ लहान मुलांना ताब्यात घेतले असून विष्णू हंडोगे आणि बच्चूबाई हंडोगे यांना अटक केली आहे.

