Suhas kande: सुहास कांदे यांच्या अंगरक्षकाकडून वेटरला धाक, पोलिसांकडून तपास सुरु
नाशिकच्या नाशिक रोड रेल्वेस्थानकातील एका हॉटेलमध्ये जेवण करीत असताना जिल्ह्यातील एका आमदाराच्या अंगरक्षकाने शासकीय रिव्हॉल्व्हर ताणून हॉटेलच्या वेटरला धमकावल्याचा प्रकार समोर आला आहे. विशाल झगडे असं ह्या अंगरक्षकाचं नाव आहे. विशाल झगडे वर नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा संपूर्ण प्रकार हॉटेलच्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे.
विशाल झगडे हा नाशिक ग्रामीण पोलिसात आमदार म्हणून कार्यरत आहे. सागर निंबा पाटील यांच्या फिर्यादी वरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नाशिक रोड येथील हॉटेल रामकृष्णमध्ये ते व्यवस्थापक आहेत. शुक्रवारी (ता. १०) रात्री साडेबाराच्या सुमारास ते हॉटेलमध्ये असताना संशयित पोलिस विशाल झगडे हा हॉटेलमध्ये दोन साथीदारांसह जेवण करण्यासाठी आला होता.
त्याने हॉटेलमधील वेटर सिरॉन शेख यास बोलाविले. त्या वेळी बोलताना संशयित झगडे याने वेटरला शिवीगाळ केली. त्यावरून वेटर बोलला असता, संशयित झगडे याने त्याच्याकडील शासकीय रिव्हॉल्व्हर काढून वेटर शेख याच्यावर ताणली आणि त्यास शिवीगाळ करीत धमकावले.
या प्रकारामुळे वेटरसह हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी आलेल्या ग्राहकांमध्ये भीती निर्माण झाली. संशयित पोलिस झगडे याच्याविरोधात सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग करण्यासह शस्त्र दाखवून धमकावणे या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिक रोड पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक पवार याबाबत पुढील तपास करत आहे.