Satara Doctor Suicide Case : सातारा डॉक्टर आत्महत्या प्रकरणात नवे वळण! दुसऱ्या आत्महत्येशी जोडले धागे?
फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्येने निर्माण झालेल्या संवेदनशील वातावरणात आता एका विवाहितेच्या मृत्यूचा धागा जोडला जाऊ लागला आहे. वाठार निंबाळकर येथील दिपाली पाचांगणे या विवाहितेच्या आत्महत्येशी या प्रकरणाचा संबंध असल्याची शक्यता तिच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे. दिपालीच्या मृत्यूचा शवविच्छेदन अहवाल जाणीवपूर्वक बदलण्यात आल्याचा आरोपही तिच्या आई-वडिलांकडून करण्यात आला आहे.
दिपालीचे लग्न 2021 मध्ये लष्करी अधिकारी अजिंक्य निंबाळकर यांच्याशी झाले होते. विवाहानंतर तिला सतत मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागला, असे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. 19 ऑगस्ट 2025 रोजी दिपालीने गळफास लावून आत्महत्या केल्याचा निष्कर्ष पोलिसांनी दिला होता. मात्र, या प्रकरणातील सत्य बाहेर यावे, यासाठी तिची आई भाग्यश्री पाचांगणे यांनी अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडवकर यांना निवेदन दिले आहे.
भाग्यश्री यांनी केलेल्या दाव्यानुसार, दिपालीचा शवविच्छेदन अहवाल तयार करणाऱ्या महिला डॉक्टर ह्याच सध्या आत्महत्या केलेल्या डॉक्टर होत्या. यामुळे दोन्ही मृत्यूंत दडलेले गूढ अधिक गडद झाले आहे. त्यांच्या मते, राजकीय दबाव आणि पोलिसांचे एकमत यामुळे सत्य लपविण्याचा प्रयत्न झाला.
दरम्यान, डॉक्टरवर अत्याचाराचा आरोप असलेला निलंबित पीएसआय गोपाल बदने शनिवारी रात्री स्वतः पोलिसांसमोर हजर झाला. त्याला न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. डॉक्टरने आत्महत्येपूर्वी हातावर लिहिलेल्या संदेशात बदनेने वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचे तर घरमालकाचा मुलगा प्रशांत बनकर याने गेल्या काही महिन्यांत मानसिक व शारीरिक छळ केल्याचे नमूद केले होते.
या सर्व घटनांमुळे तपास अधिक गंभीर टप्प्यात प्रवेशला असून, पोलिस यंत्रणा सत्य शोधण्याच्या कठीण आव्हानासमोर उभी आहे. पुढील चौकशीनंतरच दोन्ही मृत्यूमागील खरी कारणे स्पष्ट होणार आहेत.म

