Crime News: व्हिडिओ काढत असल्याच्या संशयावरून अमली पदार्थ विक्रेत्यांचा चाकू हल्ला; दोन जण जखमी
मीरा रोड- भाईंदरमधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. व्हिडिओ काढत असल्याच्या संशयावरून दोन कुख्यात अमली पदार्थ विक्रेत्यांनी दोन जणांवर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना 20 डिसेंबर 2025 रोजी काशिगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. 15 नंबर बस स्टॉपजवळ हा हल्ला झाल्याची माहिती मिळताच काशिगाव पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
पोलिसांनी जखमींचे जबाब नोंदविले असता, सोहेल आणि फिरोज हे दोघे कुख्यात गुन्हेगार व अमली पदार्थ पुरवठादार असल्याचे उघड झाले. रिक्षामध्ये बसलेले काही जण आपले व्हिडिओ काढत आहेत, असा संशय आल्याने सोहेल आणि फिरोज यांनी चाकूने हल्ला केल्याचे तपासात समोर आले आहे.
या हल्ल्यात दोन जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दोन्ही आरोपींना अटक केलं आहे. प्राथमिक तपासात या आरोपींवर यापूर्वीही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली आहे.
सध्या दोन्ही आरोपींना पुढील चौकशीसाठी पोलीस कोठडीत ठेवण्यात येणार असून, या प्रकरणाचा अधिक तपास काशिगाव पोलीस करत आहेत. परिसरात या घटनेमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
