Vaishnavi Hagawane Case : वैष्णवी हगवणेच्या वडिलांची भावनिक प्रतिक्रिया, आरोपींवर ‘मोक्का ’ लावण्याची मागणी
वैष्णवी हगवणेच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी राजेंद्र व सुशील हगवणे या दोघांना अटक केल्यानंतर वैष्णवीचे वडील अनिल कस्पटे आणि काका मोहन कस्पटे यांनी लोकशाही मराठी सोबत संवाद साधला. या संवादात अनिल कस्पटे यांनी अत्यंत भावनिक होत आपली पहिली प्रतिक्रिया दिली.
अनिल कस्पटे म्हणाले, “नुसती अटक करून उपयोग नाहीये. आरोपीची कसून चौकशी झाली पाहिजे आणि त्याच्यावर ‘मोका’सारखा कठोर कायदा लावला गेला पाहिजे. अशा निर्दयी माणसांना कठोरातील कठोर शिक्षा झाली पाहिजे.”या संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. “दादांना सांगणार आहोत की या आरोपींना अजिबात व्हीआयपी ट्रीटमेंट देऊ नये आणि कायद्यानुसार कठोर शिक्षा करावी,” अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.
आपल्या भावना व्यक्त करताना अनिल कस्पटे म्हणाले, “माझी पोटची मुलगी मारली गेली आणि हे निर्दयी लोक मोकळेपणाने हॉटेलमध्ये मटण खाऊन मौजमजा करत आहेत, हे दृश्य अत्यंत लज्जास्पद आहे. वैष्णवीला योग्य तो न्याय मिळावा, हीच माझी अपेक्षा आहे.” वैष्णवीच्या मृत्यूनंतर दुसऱ्या दिवशी मयुरी जगताप घरी येऊन त्यांनी मला आधार दिला, याचा उल्लेख करत अनिल कस्पटे म्हणाले, “मयुरी ही माझी दुसरी वैष्णवीच आहे. मयुरी मला म्हणाली की मी कायमच तुमच्या पाठीशी आहे.”
पुढे बोलताना अनिल कस्पटे म्हणाले, “दवाखाना, कोर्ट, पोलीस स्टेशन या सगळ्या गोष्टी आमच्यासाठी अनोळखी होत्या. मात्र या दुर्दैवी घटनेमुळे आता आम्हाला या सगळ्याला सामोरे जावे लागत आहे.” वैष्णवीच्या मुलाच्या भवितव्यासंदर्भात त्यांनी स्पष्ट मागणी केली की, “आमच्या वैष्णवीच्या बाळाचा ताबा कायमस्वरूपी आमच्या कुटुंबीयांकडे राहावा. तो न्याय आम्हाला न्यायालयातून मिळेल, अशी आमची आशा आहे.” दरम्यान राजेंद्र आणि सुशील हगवणे यांना आज दुपारी दोन वाजता शिवाजीनगर कोर्टात हजर केले जाणार आहे.