Happy Birthday Ashok Saraf : अशोक सराफ कसे झाले सगळ्यांचे अशोक मामा? जाणून घ्या

Happy Birthday Ashok Saraf : अशोक सराफ कसे झाले सगळ्यांचे अशोक मामा? जाणून घ्या

मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकार अशोक सराफ यांचा आज वाढदिवस

मराठी चित्रपट सृष्टीत मामा अशी ओळख असणारे व आपल्या विनोदी भूमिकांतून प्रेक्षकांना पोट धरून हसायला भाग पाडणारे मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकार अशोक सराफ यांनी चित्रपटसृष्टीत नुकतीच ५० वर्ष पूर्ण केली आहेत. आज त्यांचा वाढदिवस.

अशोक सराफ यांनी केवळ विनोदीच नव्हे तर गंभीर स्वरूपापासून ते खलनायकी प्रवृत्तीपर्यंत विविध छ्टांचे दर्शन त्यांनी आपल्या नाट्य-चित्रसृष्टीतील कामाद्वारे घडविले आहे. अशोक सराफ यांच्या नावावर प्रेक्षक आजही चित्रपट पाहायला जातात कारण प्रेक्षकांना पूर्णपणे ठाऊक असते की त्यांचा चित्रपट पैसे वसूल करून देणारा असतो. अशोक सराफ यांना “अशोकमामा’ या नावानेच अनेकजण ओळखतात, संबोधतात. मात्र, हे नाव कसे आणि कुणी दिले, हा उत्सुकतेचा विषय. हे नाव आपल्याला कसे पडले, याचा उलगडा खुद्द अशोक सराफ यांनीच केला.

अशोकमामाचे बारसे कसे झाले, याविषयीचा किस्सा सांगताना, अशोक सराफ म्हणतात, काही वर्षांपूर्वी एका चित्रपटाच्या सेटवर प्रकाश शिंदे नावाच्या कॅमेरामनबरोबर त्यांची मुलगी येत असे. सेटवर आली की ती विचारत असे, हे कोण? त्या कॅमेरामनने सांगितले, हे अशोक सराफ. पण त्यांना तू अशोकमामा म्हणायचे. आणि झालं, तिने अशोकमामा म्हणायला सुरवात केली आणि त्यानंतर काही दिवसातच सेटवर जो कोणी येईल, ते सर्वजण मला अशोकमामा म्हणूनच हाक मारू लागले. अशोकमामाचे नामकरण अशा पद्धतीने झाल्याचा किस्सा खुद्द अशोक सराफ यांनीच सांगितला.

आता एखाद्या सुंदर मुलीने मामा म्हणून हाक मारल्यावर तितकाच हिरमोडही होतो, अशी मिश्‍किल टिप्पणी ते लगेच करुन टाकतात. मला थेट अशोक अशी हाक मारणारे तसे कमीच. अशोकजी असे कुणी म्हटले, तर ते माझी मलाच झेपत नाही. तर अशोक सर वगैरे माझ्या प्रकृतीतच बसत नाही. सेटवर किंवा इतरत्र गर्दीच्या ठिकाणी चाहत्यांमधून येणाऱ्या ‘अशोकमामा’ या हाकेतला गोडवाच आपल्याला अधिक भावतो.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com