मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 'ललिता शिवाजी बाबर' टीझरचे अनावरण

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 'ललिता शिवाजी बाबर' टीझरचे अनावरण

प्रसिद्ध धावपटू, आशियाई चॅम्पियन 'माणदेशी एक्सप्रेस' म्हणजेच 'ललिता शिवाजी बाबर' यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाचे पोस्टर प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत प्रदर्शित करण्यात आले होते.
Published by :
Siddhi Naringrekar

प्रसिद्ध धावपटू, आशियाई चॅम्पियन 'माणदेशी एक्सप्रेस' म्हणजेच 'ललिता शिवाजी बाबर' यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाचे पोस्टर प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत प्रदर्शित करण्यात आले होते. आता एका कार्यक्रमाच्या निमित्ताने 'ललिता शिवाजी बाबर' या चित्रपटाचे टिझरही झळकले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या टिझरचे अनावरण करण्यात आले. यावेळी ललिता शिवाजी बाबर, अमृता खानविलकर, प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर, एंडेमॉल शाईन इंडियाचे गौरव गोखले उपस्थित होते. भारताच्या राष्ट्रीय विक्रमकारक अशी ओळख असणाऱ्या ललिता शिवाजी बाबर या सोहळ्यात बोलताना भावूक झाल्या. त्या म्हणाल्या, '' कठीण प्रसंगांचा सामना करून मी आज इथे पोहोचले आहे. आज माझा इथे सन्मान झाला, हा माझ्यासाठी खूप आनंदाचा क्षण आहे. मी अमृता खानविलकर यांच्यासह सगळ्यांचेच खूप आभार मानते.''

तर 'ललिता शिवाजी बाबर' यांची भूमिका साकारण्याचा मान मिळाल्याबद्दल अमृता खानविलकर म्हणते, '' आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने 'ललिता शिवाजी बाबर' यांची छोटीशी झलक माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दाखवायला मिळाली. याचा आनंद आहे. ललिता शिवाजी बाबर यांना समजून घेण्यासाठी, मागील एक दीड वर्षांपासून मी जे काही करत होते, हे सगळं आज मार्गी लागले. ललिताताई बोलताना खूप भावनिक झाल्या. ताईंचे साधेपण, बोलणे मनाला भिडले. माझ्यासाठी हा खास क्षण आहे. आता कुठे प्रवास सुरु झाला आहे. अजून खूप पळायचे आहे.''

प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, '' ललिता शिवाजी बाबर याच्या आयुष्यावर भाष्य करणाऱ्या चित्रपटाच्या टिझरचे आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते अनावरण झाले आणि या सोहळ्याला ललिता शिवाजी बाबर यांची उपस्थिती लाभली. याहून चांगला योग असूच शकत नाही. रिअलमधील ललिता बाबर यांची मेहनत पडद्यावर दाखवण्यासाठी रीलमधील ललिता बाबरनेही बरीच मेहनत घेतली आहे आणि ती तुम्हाला पुढील वर्षी पाहायला मिळेल.''अक्षय बर्दापूरकर, प्लॅनेट मराठी आणि एंडेमॉल शाईन इंडिया प्रस्तुत अक्षय विलास बर्दापूरकर, ऋषी नेगी, गौरव गोखले, रोनिता मित्रा या चित्रपटाचे निर्माते आहेत. 'ललिता शिवाजी बाबर' चित्रपट पुढील वर्षी २६ जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com