मेस्सीचा जन्म आसाममधला, काँग्रेस खासदाराचा दावा
कतार येथे झालेल्या विश्वचषक फायनलमध्ये अर्जेंटिनाने फ्रान्सचा पेनल्टी शूटआऊटमध्ये ४-२ असा पराभव केला. तब्बल ३६ वर्षांनंतर त्याला विश्वचषक जिंकता आला आहे. त्यानंतर जगभरातून अर्जेंटिनाचा दिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यातच शुभेच्छा देताना आसाममधील काँग्रेस खासदारांनी एक अजब दावा केला आहे.

अर्जेंटिनाचा दिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी यांचा जन्म आसाममध्ये झाल्याचा दावा काँग्रेस खासदार अब्दुल खलेक यांनी ट्विटरवर केले आहे. मात्र, नंतर त्यांनी हे ट्विट डिलीट केले. खलेक हे आसाममधील बारपेटा मतदारसंघाचे लोकसभेत प्रतिनिधित्व करतात.
कतार विश्वचषक स्पर्धेत अर्जेंटिनाच्या विजयाबद्दल मेस्सीचे अभिनंदन करताना खासदाराने ट्विटरवर लिहिले, “माझ्या मनापासून अभिनंदन. तुमच्या आसाम कनेक्शनबद्दल आम्हाला तुमचा अभिमान आहे.” दुसरीकडे, बर्याच वापरकर्त्यांनी मेस्सी आणि सचिन तेंडुलकर यांच्यात तुलना केली आणि दावा केला की अर्जेंटिनाच्या खेळाडूचेही 'महाराष्ट्र कनेक्शन' आहे कारण तेंडुलकर आणि मेस्सी दोघांनी त्यांच्या जर्सीवर 10 क्रमांक लावला आहे.