US Winter Storm: अमेरिकेच्या चिंता वाढल्या! 18 राज्यांमध्ये हाय अलर्ट; डोनाल्ड ट्रम्प अलर्ट मोडवर
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयांमुळे जगाची झोप उडवणाऱ्या अमेरिकेवर आता हिमवादळाचे नवे संकट कोसळले आहे. रस्ते बर्फाने बुजले असून, वाहतूक विस्कळीत झाली आहे. गेल्या दोन दिवसांत ९००० हून अधिक विमान उड्डाणे रद्द झाली आहेत. हवामान विभागाने १८ राज्यांत अलर्ट जारी केले असून, न्यू मेक्सिको ते न्यू इंग्लंडपर्यंत १४ कोटी लोकांना धोका असल्याचा इशारा दिला आहे.
हिमवादळाने पूर्व टेक्सास ते उत्तर कॅरोलिना भागात जोरदार हिमवृष्टी होत आहे. काही ठिकाणी चक्रीवादळासारखे नुकसान अपेक्षित आहे, तर वीजपुरवठा खंडित होण्याची शक्यता आहे. उत्तर टेक्सासमध्ये शनिवारी रात्रभर हिमवृष्टी सुरू होती आणि धोकादायक थंड वारे सोमवारपर्यंत वाहत राहतील. रात्रीचे तापमान उणे २४ अंशांपर्यंत खाली येईल.
हवामान विभागानुसार, मुसळधार बर्फवृष्टी, पाऊस आणि थंडीमुळे परिस्थिती धोकादायक बनेल. वादळ दक्षिणेतून ईशान्येकडे सरकत असून, वॉशिंग्टन, न्यू यॉर्क आणि बोस्टनमध्ये एक फूट बर्फ पडेल. ग्रामीण लुईस काउंटी आणि न्यू यॉर्कच्या उत्तर भागात तापमान उणे ३४ अंशांपर्यंत घसरणार आहे. नागरिकांना घरात राहण्याचे आवाहन करण्यात आले असून, बचाव पथके सज्ज ठेवली आहेत. भीतीचे वातावरण पसरले असून, मोठा विनाश होण्याची शक्यता आहे.
• अमेरिकेतील 18 राज्यांमध्ये भीषण हिमवादळाचा इशारा
• 9,000 हून अधिक विमान उड्डाणे रद्द, वाहतूक विस्कळीत
• तापमान उणे 34 अंशांपर्यंत घसरण्याची शक्यता
• नागरिकांना घरात राहण्याचे आवाहन, बचाव पथके सज्ज
