Chandrapur Mayoral Election
Chandrapur Mayoral Election

Chandrapur Mayoral Election : ऐनवेळी सत्तासमीकरणे बदलली, भाजपचा एक मताने विजय; ठाकरेंच्या शिवसेनेचा काँग्रेसला धक्का

चंद्रपूर महानगरपालिकेतील महापौरपदाच्या निवडणुकीत नाट्यमय घडामोडी घडत भाजपने एक मतांच्या फरकाने विजय मिळवला आहे. भाजपच्या संगीता खांडेकर या महापौरपदी निवडून आल्या.
Published by :
Riddhi Vanne
Published on

BJP's Sangeeta Khandekar Elected as Mayor : चंद्रपूर महानगरपालिकेतील महापौरपदाच्या निवडणुकीत नाट्यमय घडामोडी घडत भाजपने एक मतांच्या फरकाने विजय मिळवला आहे. भाजपच्या संगीता खांडेकर या महापौरपदी निवडून आल्या असून, या विजयामागे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा निर्णायक पाठिंबा महत्त्वाचा ठरला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या हातातून सत्ता निसटली असून स्थानिक राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे.

महानगरपालिका निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन जवळपास तीन आठवडे उलटून गेले असले, तरी चंद्रपूर महापालिकेतील सत्तास्थापनेचा पेच सुटलेला नव्हता. निवडणुकीत काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या. मात्र स्पष्ट बहुमत न मिळाल्याने सत्ता स्थापनेसाठी काँग्रेसला मित्रपक्षांच्या पाठिंब्याची गरज भासत होती. याच काळात काँग्रेसमध्ये खासदार प्रतिभा धानोरकर आणि आमदार विजय वडेट्टीवार यांच्या गटांमध्ये महापौरपदावरून मतभेद उफाळून आले. हा वाद दिल्लीतील पक्षश्रेष्ठींपर्यंत गेला आणि काही दिवसांपूर्वी तो तिथे मिटल्याचे सांगितले जात होते.

मात्र, दिल्लीतील तोडगा निघाल्याचा दावा होत असतानाच चंद्रपूरमध्ये वेगळेच राजकीय चित्र समोर आले. काँग्रेससोबत सुरू असलेल्या चर्चांना यश न आल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या स्थानिक नेतृत्वाने भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. संदीप गिऱ्हे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गटाने भाजपला उघड पाठिंबा दिल्याने सत्तेची गणिते पूर्णपणे बदलली आणि भाजपचा महापौर होण्याचा मार्ग मोकळा झाला.

या बदललेल्या सत्तासमीकरणात महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपच्या संगीता खांडेकर यांनी एक मतांच्या फरकाने विजय मिळवला. या निकालाने काँग्रेसला मोठा धक्का बसला असून, चंद्रपूर महानगरपालिकेत भाजपचा झेंडा फडकला आहे. विशेष म्हणजे, निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात झालेल्या या राजकीय हालचालींमुळे संपूर्ण निकालाचं चित्रच बदलून गेलं.

दरम्यान, भाजपचा महापौर निवडून आल्यानंतर सत्तेतील पुढील पदांबाबतही फॉर्म्युला ठरल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भाजप आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांच्यात महापौरपद सव्वा-सव्वा वर्षांसाठी वाटून घेण्यावर सहमती झाली आहे. पाच वर्षांच्या कार्यकाळात प्रत्येकी दोन टर्म महापौरपदाचे असतील, असा हा फॉर्म्युला असल्याचे सांगितले जात आहे.

याशिवाय, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रशांत दानव हे संपूर्ण पाच वर्षांसाठी उपमहापौरपद भूषवणार आहेत. तर स्थायी समितीचे अध्यक्षपद पहिल्या आणि चौथ्या वर्षी ठाकरेंच्या शिवसेनेकडे राहणार असल्याचे ठरल्याची चर्चा आहे. त्यामुळे महापालिकेतील सत्तेचे वाटप दोन्ही पक्षांमध्ये स्पष्टपणे विभागले गेले आहे.

एकीकडे भाजपसाठी हा विजय राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा ठरला असताना, दुसरीकडे काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळवूनही अंतर्गत मतभेद आणि सत्तासमीकरणांतील चुकांमुळे काँग्रेसला महापौरपद गमवावे लागले आहे. चंद्रपूर महापालिकेतील या घडामोडींमुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणात नवे संदेश जात असल्याचे राजकीय विश्लेषकांकडून सांगितले जात आहे.

थोडक्यात

  1. चंद्रपूर महानगरपालिकेतील महापौरपदाच्या निवडणुकीत नाट्यमय घडामोडी

  2. भाजपने एक मतांच्या फरकाने विजय मिळवला.

  3. भाजपच्या संगीता खांडेकर महापौरपदी निवडून आल्या.

  4. उद्धव ठाकरे गटाचा शिवसेना पाठिंबा निर्णायक ठरला.

  5. काँग्रेसच्या हातून सत्ता निसटली.

  6. स्थानिक राजकारणात मोठी उलथापालथ दिसत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com