Cabinet Meeting : मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयांचा धडाका; शेतकरी, उद्योग, पायाभूत सुविधांसाठी 19 मोठे निर्णय, हजारो कोटींच्या कामांना हिरवा कंदील
राज्य मंत्रिमंडळाची आज अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली असून या बैठकीत तब्बल 19 मोठे आणि दूरगामी परिणाम करणारे निर्णय घेण्यात आले आहेत. विशेष म्हणजे या निर्णयांचा केंद्रबिंदू शेतकरी, सिंचन, उद्योग, आरोग्य, शिक्षण आणि पायाभूत सुविधा असा सर्वांगीण विकासावर भर देणारा आहे. राज्यातील अनेक रखडलेल्या प्रकल्पांना गती मिळणार असून हजारो कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत दिवंगत नेते अजित पवार यांनी पाठपुरावा केलेल्या तीन महत्त्वाच्या निर्णयांनाही मान्यता देण्यात आली. यामध्ये बारामती जिल्हा क्रीडा संकुल, मानवत येथील सूतगिरणीला अर्थसहाय्य आणि औद्योगिक विकासाशी संबंधित निर्णयांचा समावेश आहे.
शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा
जलसंपदा विभागाच्या माध्यमातून नाबार्डकडून 15 हजार कोटी रुपयांचे दीर्घ मुदतीचे कर्ज घेण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. या निधीतून राज्यातील 57 अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यात येणार असून 193 पूर्ण प्रकल्पांच्या वितरण व्यवस्थेत सुधारणा केली जाणार आहे. परिणामी सुमारे 8 लाख हेक्टर शेती क्षेत्राला सिंचन सुविधा उपलब्ध होणार असून लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. याशिवाय अकोला जिल्ह्यातील पिंपळशेंडा (ता. मुर्तिजापूर) येथील लघुपाटबंधारे प्रकल्पाच्या दुरुस्तीसाठी 6 कोटी 60 लाख रुपयांच्या अंदाजपत्रकास मंजुरी देण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे 255 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.
पायाभूत सुविधा आणि उद्योगांना गती
पुणे जिल्ह्यातील पुरंदर येथील विमानतळ प्रकल्पासाठी विशेष हेतू प्राधिकरण स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी भूसंपादन आणि अनुषंगिक कामांसाठी 6 हजार कोटी रुपयांचे कर्ज घेण्यात येणार असून एमआयडीसी, एमएडीसी आणि सिडको यांची सहभागीदारी राहणार आहे. या कर्जाला शासन हमी देणार आहे, त्यामुळे प्रकल्पाला गती मिळणार आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम उभारण्यास मंजुरी देण्यात आली आहे. करवीर तालुक्यातील विकासवाडी येथे 12 हेक्टर 76 आर शासकीय जमीन उपलब्ध करून देण्यात येणार असून यामुळे कोल्हापूरच्या क्रीडा विकासाला नवी दिशा मिळणार आहे. तसेच नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील मौजा लिंगा येथे ‘कोल टू केमिकल’ प्रकल्पासाठी 117 हेक्टर 19 आर जमीन एमआयडीसीला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे औद्योगिक गुंतवणूक आणि रोजगारनिर्मितीला चालना मिळणार आहे.
‘तिसरी मुंबई’ संकल्पनेला बळ
अटल बिहारी वाजपेयी शिवडी–न्हावा शेवा अटल सेतूच्या प्रभाव क्षेत्रात नव्या नगर विकास प्राधिकरणासाठी भूसंपादन व भूवाटप धोरणाला मान्यता देण्यात आली आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत भविष्यात राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पांना यामुळे गती मिळणार असून ‘तिसरी मुंबई’ संकल्पना प्रत्यक्षात उतरणार आहे.
आरोग्य, शिक्षण आणि प्रशासनात सुधारणा
राज्यात ‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियान राबविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. गावपातळीवर आरोग्य सुधारणा घडवून आणण्यासाठी जीवनशैली, आहार, प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि वेळेवर उपचार या चार स्तंभांवर हे अभियान आधारित असेल. यासाठी दरवर्षी 80 कोटी 75 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. प्रशासन अधिक सक्षम करण्यासाठी राज्यात 11 अपर जिल्हाधिकारी पदांची निर्मिती करण्यास मान्यता देण्यात आली आहे. वाढलेली लोकसंख्या आणि भौगोलिक विस्तार लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे.
क्रीडा, शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रातील निर्णय
बारामती जिल्हा क्रीडा संकुल अंतर्गत कटफळ येथे 75 कोटी 13 लाख रुपयांच्याn क्रीडा सुविधांना मंजुरी देण्यात आली आहे. यात जलतरण तलाव, स्केटिंग रिंग, आर्चरी रेंज, बास्केटबॉल मैदान आणि भव्य पॅव्हेलियन उभारण्यात येणार आहे. राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनातील बक्षिसांच्या रकमेत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला असून विद्यार्थी, शिक्षक आणि प्रयोगशाळा परिचरांना याचा फायदा होणार आहे.
कायदे, कर आणि शासकीय प्रक्रियांमध्ये सुधारणा
ई-मेलद्वारे पाठवण्यात येणारी नोटीसही कायदेशीर मान्य करण्याचा निर्णय घेण्यात आला असून महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमात सुधारणा करण्यात आली आहे. तसेच कर, व्याज आणि दंडाच्या थकबाकीची तडजोड करण्यासंदर्भातील अध्यादेशालाही मंजुरी देण्यात आली आहे. यासोबतच उच्च आणि तंत्र शिक्षण क्षेत्राशी संबंधित दोन महत्त्वाच्या कायद्यांमध्ये सुधारणा करण्यासही मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.
थोडक्यात
आज राज्य मंत्रिमंडळाची अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली.
या बैठकीत 19 मोठे आणि दूरगामी परिणाम करणारे निर्णय घेण्यात आले.
निर्णयांचा केंद्रबिंदू: शेतकरी, सिंचन, उद्योग, आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधा
राज्यातील रखडलेल्या प्रकल्पांना गती मिळणार.
हजारो कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली.
दिवंगत नेते अजित पवार यांनी पाठपुरावा केलेल्या तीन महत्त्वाच्या निर्णयांनाही मान्यता
यात समावेश: बारामती जिल्हा क्रीडा संकुल, मानवत येथील सूतगिरणीला अर्थसहाय्य, औद्योगिक विकासाशी संबंधित निर्णय

