Ajit Pawar: अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून घेतला मोठा निर्णय, राजकारणात घडामोडींना मिळाला नवीन वेग

Ajit Pawar: अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून घेतला मोठा निर्णय, राजकारणात घडामोडींना मिळाला नवीन वेग

Maharashtra Politics: अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने वेगाने निर्णय घेतला. सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रिपद, तीन खात्यांची जबाबदारी आणि विधानमंडळ गटनेतेपद मिळाले.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील दुर्दैवी निधनाने राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर पक्षाने वेगाने निर्णय घेत सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपवली आहे. अर्थमंत्रिपद वगळता इतर तीन खात्यांची जबाबदारीही त्यांच्यावर टाकण्यात आली असून, राष्ट्रवादीच्या विधिमंडळ गटनेतेपदी त्यांची निवड झाली आहे. याशिवाय पक्षातील सर्व निर्णय घेण्याचे पूर्ण अधिकारही त्यांना मिळाले आहेत.

उपमुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीपूर्वी मुंबईत आयोजित राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांच्या बैठकीत या सर्व बाबींवर एकमताने निर्णय झाला. सुनेत्रा पवार यांच्या या नियुक्तीने पक्षातील नेतृत्व परिवर्तनाला वेग आला असून, आता राष्ट्रवादी महायुती सरकारमधील भूमिका कशी घडेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी राज्यात झालेल्या महापालिका निवडणुकांमध्ये भाजपला मोठे यश मिळाले होते. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकांमध्येही भाजपचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आले. या दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शरद पवार गट एकत्र येऊन भाजपला आव्हान दिले, तरी राष्ट्रवादीला अपेक्षित यश मिळाले नाही. भाजपने अनेक ठिकाणी शिवसेना (शिंदे गट) सोबत युती करून विजय मिळवला, तर राष्ट्रवादी अजित पवार गटाने काही ठिकाणी शरद पवार गटाशी युती केली आणि काही ठिकाणी स्वबळावर लढली.

अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीने पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर निवडणुकीत उमेदवार न उतरवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पक्षाकडून ही निवडणूक लढवली जाणार नसल्याने भाजपचा उमेदवार बिनविरोध निवडून येण्याची शक्यता आहे. आज दुपारी ३ ते ५ वाजेपर्यंत महापौरपदासाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे, त्यामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपचाच महापौर होणार हे जवळजवळ निश्चित झाले आहे. या घडामोडींमुळे महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे आणखी गुंतागुंतीची झाली असून, राष्ट्रवादीची पुढील रचना आणि महायुतीतील बदलांकडे लक्ष लागले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com