Amit Satam's first reaction as soon as the reservation was announced
Amit Satam's first reaction as soon as the reservation was announced

Amit Satam : महापौर कोण होणार? आरक्षण जाहीर होताच अमित साटम यांची पहिली प्रतिक्रिया

राज्यातील २९ महानगरपालिकांमधील महापौरपदासाठी आज अधिकृतपणे आरक्षण जाहीर करण्यात आलं आहे. नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत ही आरक्षण सोडत पार पडली.
Published by :
Riddhi Vanne
Published on

राज्यातील २९ महानगरपालिकांमधील महापौरपदासाठी आज अधिकृतपणे आरक्षण जाहीर करण्यात आलं आहे. नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत ही आरक्षण सोडत पार पडली. या सोडतीत मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर झालं असून, त्यामुळे आगामी काळात मुंबई महानगरपालिकेचं नेतृत्व महिला महापौराकडे असणार आहे. मुंबईसह पुणे, छत्रपती संभाजीनगर, नवी मुंबई, नागपूर, नांदेड-वाघाळा या प्रमुख महानगरपालिकांमध्येही खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद आरक्षित झालं आहे. मुंबईतील विद्यमान राजकीय संख्याबळ पाहता महापौरपद महायुतीतील भाजपकडे जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

आरक्षण जाहीर होताच भाजप नेते अमित साटम यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली. “मुंबई शहराला योग्य दिशा देण्यासाठी, भ्रष्टाचारमुक्त प्रशासन देण्यासाठी आणि मुंबईची सुरक्षितता अबाधित ठेवण्यासाठी महिलांच्या नेतृत्वाचा आम्हाला अभिमान आहे. मुंबईची ‘तुंबई’ होणार नाही, विकासाच्या मार्गावर असलेली मुंबई मातृशक्तीच्या नेतृत्वाखाली पुढे जाईल,” असं साटम यांनी स्पष्ट केलं.

पुढील प्रक्रिया स्पष्ट करताना साटम म्हणाले की, “येणाऱ्या दोन-तीन दिवसांत भाजप आणि शिवसेनेच्या गट बैठका होतील. त्यानंतर सभागृह नेत्याची निवड केली जाईल आणि त्याच दिवशी अधिकृत नोंदणी होईल.” महापौरपदासाठी नेमकं कोण नाव पुढे येईल, या प्रश्नावर त्यांनी सूचक उत्तर देत म्हटलं, “सगळे पत्ते आत्ताच उघडले तर उत्सुकता राहणार नाही.”

दरम्यान, ठाकरे गटाने मुंबईच्या महापौर आरक्षण सोडतीवर आक्षेप नोंदवला होता. यावर साटम यांनी तीव्र टीका करत म्हटलं की, “आक्षेप घेणाऱ्यांना नियमांचा अभ्यास नाही. रुल नंबर ३(१) नुसार किमान तीन एसटी नगरसेवक असतील तरच एसटी आरक्षण लागू होतं. मुंबईत केवळ दोन एसटी नगरसेवक आहेत, त्यामुळे हे आरक्षण लागू होऊ शकत नाही.”

“मुंबईला याआधी एसटी आरक्षण मिळालं होतं, त्यामुळे यावेळी ते बाहेर काढण्यात आलं आहे. ओबीसी आरक्षणाचा क्रमांक येण्यासाठी अजून वेळ आहे, कदाचित पुढच्या वेळी ओबीसी आरक्षण लागू होऊ शकेल,” असंही साटम यांनी स्पष्ट केलं. ठाकरे गटावर निशाणा साधताना ते म्हणाले, “मुंबईकरांनी त्यांना का कमी केलं, याची आत्मपरीक्षण त्यांनी करावी. अराजकता पसरवण्याशिवाय त्यांना काहीही जमत नाही.”

थोडक्यात

• राज्यातील 29 महानगरपालिकांमधील महापौरपदासाठी अधिकृत आरक्षण जाहीर...
• नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत पार पडली.
• मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी सर्वसाधारण महिला प्रवर्ग आरक्षित..
• त्यामुळे आगामी काळात मुंबईला महिला महापौर मिळणार..
• मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नवी मुंबई, नागपूर, नांदेड-वाघाळा येथेही
– खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद आरक्षित.
• मुंबईतील विद्यमान राजकीय संख्याबळ पाहता.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com