AYUSH Mela 2026: शेगावात आयुष आरोग्य महामेळावा, शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव यांनी केले आवाहन
संदिप शुक्ला | लोकशाही मराठी न्यूज
बुलढाणा जिल्ह्यातील संत नगरी शेगाव येथे २५ फेब्रुवारीपासून भव्य 'आयुष आरोग्य महामेळाव्याचे' आयोजन करण्यात आले असून या महामेळाव्यात शेतकऱ्यांसाठी वन शेती ,औषधी वनस्पती संदर्भात तज्ञ मार्गदर्शन करणार आहे .आयुर्वेद शेती उत्पादन कार्यक्रमात शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव यांनी आवाहन केले आहे.
२५ ते २७ फेब्रुवारीपर्यंत संत नगरी शेगाव येथील विसावा परिसरात आयुष मंत्रालयाच्या वतीने आयुष आरोग्य महामेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या मेळाव्याचे उद्घाटन 25 फेब्रुवारीला राष्ट्रपती द्रोपती मुर्मू यांच्या हस्ते होणार आहे त्यानंतर दुपारी 3 वाजता शेतकरी बांधवांसाठी आयुर्वेदिक शेती उत्पादन आणि विक्री मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे
आयुर्वेदिक शेती उत्पादन विक्री मार्गदर्शन
या महामेळाव्यात विशेषतःशेतकऱ्यांसाठी वन औषधी शेती, प्रक्रिया आणि विपणन यावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळणार आहे. पारंपारिक पद्धतीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना आयुर्वेदिक शेतीची जोड मिळावी तर शेतकऱ्यांचा आर्थिक फायदा होईल या उद्देशाने केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव यांच्या संकल्पनेतून या आयुष आरोग्य महामेळाव्यामध्ये आयुर्वेदिक शेती व उत्पादन विक्री , प्रक्रिया आणि विपणन यावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आहे यामध्ये नॅशनल मेडिसिनल प्लांट बोर्ड, नवी दिल्लीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रोफेसर (डॉ.) महेश कुमार दाधीच आणि डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला अंतर्गत असलेल्या नागार्जुन वन औषधी प्रकल्पाचे प्रभारी अधिकारी डॉ. नितीन पतके हे उपस्थित राहून शेतकऱ्यांना माहिती देणार आहे.
शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांऐवजी औषधी वनस्पतींच्या उत्पादनाकडे वळावे, जेणेकरून त्यांना शाश्वत उत्पन्न मिळेल आणि जनतेलाही दर्जेदार नैसर्गिक उपचार उपलब्ध होतील, आणि शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढण्यास मदत होईल असा मानस आयुषमंत्री प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केला आहे.
केंद्रीय आयुष मंत्रालयामार्फत आयोजित या मेळाव्यात मंत्रालयांतर्गत येणाऱ्या आयुर्वेद, योग, निसर्गोपचार, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी या सर्व विभागांचे स्वतंत्र स्टॉल्स लावण्यात येणार आहेत. केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांच्या संकल्पनेतून शेगावच्या पावन भूमीत हा आरोग्य महामेळावा साकारत आहे या मेळाव्याच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढवणे आणि सामान्य जनतेला उत्तम आरोग्य सेवा पुरवणे, असा दुहेरी उद्देश ठेवण्यात आला आहे.
राष्ट्रपतींच्या नियोजित दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सुरक्षेसह मेळाव्याच्या नियोजनाची तयारी सुरू असून, २५ ते २७ फेब्रुवारी दरम्यान हा आरोग्य जागर शेगावात अनुभवता येणार आहे.
