Board Exam Alert: राज्यात परीक्षा महापर्व! दहावीचे 16 लाख तर बारावीचे 15 लाख विद्यार्थी उतरणार रणांगणात; शिक्षण मंडळ सज्ज
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने यंदाच्या वर्षीच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांसाठी तारखा जाहीर केल्या आहेत. इयत्ता बारावीची परीक्षा १० फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत तर दहावीची परीक्षा २० फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत घेतली जाणार आहे. प्रात्यक्षिक परीक्षा शुक्रवारपासून सुरू झाल्या असून, राज्यभरातील विद्यार्थी या परीक्षांसाठी सज्ज झाले आहेत.
दहावीसाठी एकूण १६ लाख १४ हजार ९८७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे, तर बारावीसाठी १५ लाख ३२ हजार ८६२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. ही परीक्षा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नऊ मंडळांच्या विभागीय माध्यमातून घेतल्या जात आहेत. मागील वर्षीप्रमाणे यंदाही राज्य मंडळातर्फे कॉपीमुक्त अभियान राबवले जात असून, सर्व जिल्ह्यांमध्ये त्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
मुंबई विभागातून दहावीसाठी ३ लाख ४९ हजार ६१२ विद्यार्थी परीक्षा देत आहेत. एकूण दहावीच्या १६ लाख १४ हजार ९८७ विद्यार्थ्यांची परीक्षा ५११ परीक्षा केंद्रांवर घेतली जाणार आहे. पुणे विभागातून २ लाख ७८ हजार ८६, नागपूर विभागातून १ लाख ५३ हजार ९३७, छत्रपती संभाजीनगर विभागातून १ लाख ९१ हजार ८८५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
याशिवाय कोल्हापूर विभागातून १ लाख ३२ हजार ७९७, अमरावती विभागातून १ लाख ६५ हजार ३१८, नाशिक विभागातून २ लाख ६ हजार ५२८, लातूर विभागातून १ लाख ११ हजार ५५ आणि कोकण विभागातून २५ हजार ७६९ विद्यार्थ्यांनी दहावीसाठी नोंदणी केली आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या तयारीसाठी मेहनत घेतली असून, मंडळाकडून पारदर्शक आणि सुरक्षित परीक्षा घेण्यावर भर दिला जात आहे.
दहावी व बारावीच्या परीक्षांना फेब्रुवारीपासून सुरुवात
३१ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी
राज्यभर ५११ परीक्षा केंद्रांवर परीक्षा आयोजन
कॉपीमुक्त व सुरक्षित परीक्षा घेण्यावर शिक्षण मंडळाचा भर
