Badlapur Incident: बदलापूरच्या घटनेनंतर काँग्रेसचा आक्रमक पवित्रा; हर्षवर्धन सपकाळांचा सत्ताधाऱ्यांना थेट इशारा
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
बदलापूरमध्ये घडलेल्या लहान मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनेमुळे संतापाची लाट उसळली असून, महाराष्ट्रात गुन्हेगारांचा उच्छाद मांडला जात असल्याचा आरोप करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती हल्लाबोल केला आहे. फडणवीस हे महाराष्ट्राचे आतापर्यंतचे सर्वात निष्क्रिय, अकार्यक्षम आणि बेजबाबदार मुख्यमंत्री असल्याचे म्हणत त्यांनी सरकारच्या कायदा-व्यवस्थेच्या हातच नीट धरल्याचा सवाल उपस्थित केला.
या प्रकरणासंदर्भात बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, चार-पाच वर्षांच्या मुलींवर अत्याचार होत असताना राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना झोप कशी लागते? दीड वर्षापूर्वी बदलापूरात लहान शाळकरी मुलींवर असाच लैंगिक अत्याचार घडला होता. त्या घटनेत भाजपा आणि संघाशी संबंधित शाळेच्या अध्यक्ष व सचिवांवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. जनतेने रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन केल्यानंतरच सरकारला खडबडून जाग आली होती. मात्र, पुढे त्या प्रकरणाचा पत्ताही नसल्याचे राज्याने पाहिले आहे. प्रशासन कामच करत नसल्यामुळे गुन्हेगारांचे मनोबल वाढले आहे. काल बदलापूरात घडलेल्या या नव्या प्रकरणात सरकारने तात्काळ कठोर कारवाई करावी, अन्यथा जनता रस्त्यावर उतरेल, असा इशाराही सपकाळ यांनी दिला.
सपकाळ यांनी सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्येचे प्रकरणही उपस्थित केले. भाजपाच्या माजी खासदाराच्या अत्याचाराला कंटाळून त्यांना आत्महत्या करावी लागली, तरी या प्रकरणात कोणतीही कारवाई झाली नाही. मुख्यमंत्री फडणवीस यांनी कोणतीही चौकशी न करता क्लिन चिट देऊन टाकली, असा त्यांचा आरोप आहे. अंकिता भंडारी प्रकरण, उन्नाव बलात्कार प्रकरण, महिला कुस्ती खेळाडूंवरील लैंगिक अत्याचार अशा अनेक घटनांमध्ये दिल्लीपासून गल्लीपर्यंत भाजपाशी संबंधित लोकांचा सहभाग असल्याचे उघड झाले आहे, तरीही कारवाई होत नाही, असेही ते म्हणाले.
भाजपा महायुती सरकारमध्ये आका, खोके, वाळू माफिया, ड्रग्ज माफिया आणि लँड माफियांना मोकळे रान आहे, तर महिला व मुलींची सुरक्षा रामभरोसे आहे, असे शेवटी हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. या वक्तव्याने राज्यातील राजकीय वातावरण तापले असून, काँग्रेसकडून सरकारविरोधात आंदोलनाची हाक दिली जात आहे.
