Mira-Bhayandar: डिंपल मेहता नकोत, रुबीना फिरोज चालतात? भाजप आमदार नरेंद्र मेहता यांचा सवाल
मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी काँग्रेस-शिवसेना (ठाकरे गट) आघाडीकडून रुबीना फिरोज यांनी तर भारतीय जनता पक्षाकडून डिंपल मेहता यांनी नामांकन दाखल केले आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने मराठी महापौर दिला नाही, अशी टीका विरोधकांकडून केली जात आहे. मात्र काँग्रेस-शिवसेना आघाडीकडूनही मराठी उमेदवार न दिला गेल्याने ही टीका एकतर्फी आणि दुहेरी निकषांवर आधारित असल्याचा सवाल भाजपकडून उपस्थित करण्यात आला आहे.
भाजपने थेट प्रश्न उपस्थित करत म्हटले, "डिंपल मेहता चालणार नाहीत, पण रुबीना फिरोज चालतील का?" एकाच निकषांवर दोन्ही पक्षांचे मूल्यांकन व्हायला हवे, अन्यथा ही टीका राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे पक्षाचे म्हणणे आहे. भाजपने स्पष्ट केले की, पक्ष जात-पात, धर्म किंवा समाजाच्या आधारावर राजकारण करत नाही. विकास, पारदर्शकता आणि कार्यक्षम नेतृत्व हेच पक्षाचे प्रमुख निकष आहेत.
काही घटक जाणीवपूर्वक समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असून, अशा फूट पाडणाऱ्या राजकारणापासून नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहन भाजपने केले आहे. मिरा-भाईंदर शहराचा सर्वांगीण विकास, मजबूत प्रशासन आणि जनतेच्या हिताचे निर्णय घेणे हाच भाजपचा अजेंडा असून तो पुढेही कायम राहील, असा विश्वास पक्षाने व्यक्त केला आहे. या निवडणुकीत महापौरपदासाठी उमेदवारांची अंतिम यादी जाहीर होण्यापूर्वीच राजकीय वाद तापला असून, निवडणूक प्रक्रियेवर सर्वांचे लक्ष लागले आहे.
