Mumbai Climate Week: देशातील पहिल्या ‘मुंबई क्लायमेट वीक’ उपक्रमाची आजपासून सुरूवात
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
देशातील पहिला ‘मुंबई क्लायमेट वीक’ उपक्रम आजपासून विविध मान्यवरांच्या उपस्थितीत सुरू होणार असून, १७ ते १९ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत हा जागतिक हवामान संवाद मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेंशन सेंटर येथे आयोजित होईल. शहराला ग्लोबल साऊथमधील नागरिक-आधारित हवामान मंचाचे केंद्रस्थान देणारा हा उपक्रम पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या सहकार्याने प्रोजेक्ट मुंबई या सामाजिक संस्थेने राबविला आहे. या तीन दिवसीय कार्यक्रमात तळागाळातील संस्था, विविध क्षेत्रातील नेते, उद्योग तज्ज्ञ आणि धोरणकर्ते भारत व ग्लोबल साऊथमधील हवामान उपायांवर सखोल चर्चा करणार आहेत.
जागतिक व राष्ट्रीय पातळीवरील नेतृत्व या मंचावर एकत्र येणार असून, यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुकेश अंबानी, बाबा कल्याणी, माजी अमेरिकन परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन, सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ सौम्या स्वामिनाथन, उद्योग क्षेत्रातील एस्थर फिनिदोरी, दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर यांच्यासह केंद्रीय मंत्री, आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींसह १०० हून अधिक संस्था आणि ४०० वक्ते सहभागी होणार आहेत. शहरी लवचिकता, अन्न व्यवस्था आणि ऊर्जा संक्रमण या प्रमुख विषयांवर लक्ष केंद्रित करून व्यावहारिक उपाय शोधले जाणार आहेत.
हवामान बदलाच्या वाढत्या आव्हानांवर मुंबईकडून जागतिक नेतृत्व घेण्याचा हा प्रयत्न असून, नागरिक सहभाग, सार्वजनिक-खासगी भागीदारी आणि शाश्वत उपायांवर भर देण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे मुंबई ग्लोबल साऊथसाठी हवामान कृतीचे प्रमुख व्यासपीठ म्हणून उदयास येईल, अशी अपेक्षा आहे.
