Jalgaon Accident
Jalgaon Accident

Jalgaon Accident: भरधाव वेग ठरला जीवघेणा! जळगावमध्ये अर्टिका कारचा भीषण अपघात, २ जण जागीच ठार

Road Safety: जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात भरधाव अर्टिका कार दुभाजकावर आदळून दोन जणांचा जागीच मृत्यू, तर तीन जण गंभीर जखमी झाले.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील विरवाडा येथून चोपड्याच्या दिशेने येत असताना आज (१६ फेब्रुवारी) सकाळी ५.३० वाजेच्या सुमारास अर्टिका कारचा (एमएच १९ बीएस १००८) भीषण अपघात झाला. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार दुभाजकावर आदळून ती अक्षरशः चेंदामेंदा झाली. या दुर्घटनेत दोघांचा जागीच मृत्यू झाला असून, तीन जण गंभीर जखमी आहेत.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदतकार्य सुरू केले आणि जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मृत्यू झालेल्यांमध्ये राहुल अमृत भोई आणि मयूर अरुण राजपूत यांचा समावेश आहे. जखमींमध्ये बंटी रविंद्र कोळी, राकेश भगवान राजपूत (गिरासे) आणि विजय अमृत भोई यांच्यावर उपचार सुरू आहेत, ज्यांची प्रकृती चिंताजनक आहे. चोपडा पोलिसांनी या प्रकरणाची नोंद करून तपास सुरू केला आहे.

कालिंका माता चौकात डंपरने चिरडले वृद्धाचे निधन; नागरिकांची मागणी

दुसरीकडे, जळगाव शहरातील कालिंका माता चौकात भरधाव डंपरने भाजीपाला घेऊन जाणाऱ्या ५७ वर्षीय प्रभाकर पाटील यांना चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. डंपर चालक मोबाईलवर बोलत असल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण आहे.

या चौकात वर्षभरापूर्वी डंपरने एका बालकाला चिरडल्याची घटना घडली असल्याने नागरिकांनी अद्ययावत ट्रॅफिक सिग्नल व्यवस्था आणि २४ तास वाहतूक पोलिसांची नेमणूक करण्याची मागणी केली आहे. पोलिस प्रशासनाने तातडीने कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com