Maharashtra Weather
MAHARASHTRA WEATHER ALERT: WINTER RAIN LIKELY IN NEXT 24 HOURS ACROSS SEVERAL DISTRICTS

Maharashtra Weather : ऐन थंडीत पावसाची चाहूल! पुढील 24 तास महत्त्वाचे, 'या' भागांत हलक्या सरींची शक्यता

Winter Rain: महाराष्ट्रात ऐन हिवाळ्यात हवामानात बदल होत असून पुढील २४ तास महत्त्वाचे ठरणार आहेत.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

राज्यातील बहुतांश भागांत थंडीचा प्रभाव कायम आहे. अंतर्गत महाराष्ट्रात पहाटेच्या किमान तापमानात लक्षणीय घट नोंदवली जात असून, अहमदनगरमध्ये ११.४ अंश, जेऊरमध्ये ११ अंश तर मोहोळमध्ये ११.८ अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदले गेले. नाशिक (१२.६), सातारा (१२.६), महाबळेश्वर (१३.१) आणि जळगाव (१३.५) येथेही थंडीची तीव्रता जाणवत आहे. मराठवाड्यात औरंगाबाद व उस्मानाबाद येथे किमान तापमान १४ अंशांवर स्थिरावले असून, बीडमध्ये १६ अंश नोंदले गेले.

कोकण आणि मुंबई भागात हवामान ढगाळ आहे. सकाळी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि मुंबई-ठाणे परिसरात हलका धुका आणि तुरळक पावसाच्या सरी पडल्या. दुपारी मुंबईत आकाश अंशतः ढगाळ राहील, तर किनाऱ्यावर मध्यम ते जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे. मुंबईमध्ये कमाल तापमान २८ ते ३२ अंश आणि किमान तापमान १८ ते २२ अंश सेल्सिअस राहील.

मुंबई महानगरात थंडीचा प्रभाव सौम्य आहे. कुलाबा येथे १९.३ अंश तर सांताक्रूझ येथे १७.७ अंश किमान तापमान नोंदले गेले. ठाणे परिसरात २० अंशांच्या आसपास तापमान राहिले असून, दिवसभर ऊन आणि हलका वारा यामुळे हवामान कोरडे राहिले. पुढील दोन दिवसांत ढगांचे प्रमाण वाढेल, पण लक्षणीय पाऊस पडण्याची शक्यता नाही.

निवृत्त हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांच्या अंदाजानुसार, ६ फेब्रुवारीपर्यंत ११ जिल्ह्यांत किमान तापमानात हळूहळू वाढ होईल आणि थंडी कमी होईल. मात्र, उर्वरित २५ जिल्ह्यांत २९ जानेवारीपर्यंत थंडी कायम राहील. ३० जानेवारी ते ६ फेब्रुवारीदरम्यान थंडीचे प्रमाण कमी होईल, तर फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून उत्तर महाराष्ट्र वगळता पुन्हा थंडीत वाढ होण्याची शक्यता आहे. सोमवार व मंगळवार रोजी सांगली, सोलापूर, सातारा, अहमदनगर, बीड, धाराशिव, जालना, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, बुलढाणा आणि अमरावती या भागांत ढगाळ वातावरण आणि तुरळक पाऊस पडेल.

Summary
  • राज्यातील अनेक भागांत कडाक्याची थंडी कायम आहे.

  • कोकण व मुंबई परिसरात ढगाळ वातावरण आणि तुरळक पावसाचा अंदाज.

  • पुढील २४ तास हवामानाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार.

  • काही जिल्ह्यांत थंडी कमी होण्याची तर काही भागांत कायम राहण्याची शक्यता.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com