Mumbai Cyber Crime: मुंबईत शेअर ट्रेडिंगच्या जाळ्यातून ६६ लाखांची फसवणूक; गुन्हेगारांचा हाय-प्रोफाईल खेळ उघडकीस
मुंबई उपनगरातील पंतनगर, भांडुप आणि मुलुंड भागात शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली पाच रहिवाशांची फसवणूक झाली आहे. यात एका महिलेसह ३८ ते ७४ वर्षे वयोगटातील दोन निवृत्त सरकारी अधिकारी, मध्य रेल्वे कर्मचारी आणि दोन व्यावसायिकांचा समावेश आहे. एकूण ६६ लाख रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार पूर्व क्षेत्र सायबर सेलमध्ये दाखल झाली असून, २५ अज्ञात आरोपींवर कारवाई सुरू आहे.
फसवणूक करणाऱ्यांनी पीडितांना वेगवेगळ्या दिवशी व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये जोडले आणि शेअर बाजारात मोठ्या नफ्याचे आमिष दाखवले. सुरुवातीला छोट्या गुंतवणुकीवर कमी परतावा देऊन विश्वास संपादन करून नंतर मोठ्या रकमा ट्रान्सफर करण्यास प्रवृत्त केले. पीडितांमध्ये ५० वर्षीय निवृत्त अधिकाऱ्याने १८.४५ लाख, ४४ वर्षीय महिलेने ११.४० लाख, ७४ वर्षीय निवृत्त अधिकाऱ्याने १२.६५ लाख, ३८ वर्षीय रेल्वे अधिकाऱ्याने १०.७५ लाख आणि ६० वर्षीय व्यावसायिकाने १२.५९ लाख गुंतवले.
फसवणूक लक्षात येताच पीडितांनी ताबडतोब सायबर सेलमध्ये वेगवेगळे एफआयआर दाखल केले. प्रत्येक प्रकरणात १० लाखांपेक्षा जास्त रक्कम गुंतलेली आहे. सायबर पोलिस ट्रान्झॅक्शन आयडी आणि बँक खात्यांचा तपास करत असून, पैसे हस्तांतरित झालेल्या मार्गांचा छडा लावण्यात येत आहे. ही फसवणूक पद्धत नवीन नसली तरी एकाच भागात हाय-प्रोफाइल व्यक्तींना लक्ष्य करणे धक्कादायक आहे. सायबर तज्ज्ञांनी गुंतवणूक करताना अधिकृत प्लॅटफॉर्म तपासण्याचे आवाहन केले आहे.
