Mumbai Missing Children: मुंबईत ३६ तासांत १२ मुले बेपत्ता; मानवी तस्करीच्या भीतीने शहर ‘हाय अलर्ट’वर
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत गेल्या ३६ तासांत धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील वेगवेगळ्या सात पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून तब्बल १२ अल्पवयीन मुले बेपत्ता झाली असून, यामध्ये ८ मुलींचा समावेश आहे. या सामूहिक बेपत्ता प्रकरणांमुळे मुंबईत मोठी खळबळ माजली असून, पोलीस प्रशासनाने शहरात 'हाय अलर्ट' जारी केला आहे. यामागे मुलांच्या तस्करीची (Trafficking) संघटित टोळी सक्रिय असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मुंबई पोलिसांनी या सर्व प्रकरणांमध्ये भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम १३७(२) अन्वये अज्ञातांविरुद्ध अपहरणाचे गुन्हे दाखल केले आहेत. झोपडपट्टी परिसर, रेल्वे स्थानके आणि बस डेपो यांसारख्या गर्दीच्या ठिकाणी शोधमोहीम तीव्र करण्यात आली आहे.
मुलांच्या वाढत्या बेपत्ता प्रकरणांमागे मानवी तस्करीचे रॅकेट असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. बेपत्ता मुलांमध्ये मुलींचे प्रमाण अधिक असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
बेपत्ता मुलांची वाढती आकडेवारी
मुंबई पोलिसांच्या आकडेवारीनुसार, जून ते डिसेंबर २०२५ या कालावधीत एकूण १४५ मुले बेपत्ता झाली होती, ज्यापैकी ९३ मुली होत्या. १ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर या काळात ८२ गुन्हे दाखल झाले असून, त्यात किशोरवयीन मुलांचे प्रमाण निम्म्याहून अधिक आहे.
प्रशासनाचे आवाहन
मुंबई पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणे, बस स्थानके आणि रुग्णालयांमध्ये बेपत्ता मुलांचे फोटो प्रसिद्ध केले आहेत. नागरिकांना संशयास्पद हालचाली आढळल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
