Mumbai Pune Expressway
GAS TANKER ACCIDENT, ALTERNATE ROUTES AND TRAVEL ADVISORY

Mumbai-Pune Expressway Traffic : मुंबई-पुणे एक्सप्रेसवे जाम, प्रवाशांसाठी सर्वोत्तम पर्यायी मार्ग काय आहेत?

Gas Tanker Accident: मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर टँकर अपघातामुळे 15-20 किलोमीटर जाम निर्माण झाला आहे. प्रशासनाने पर्यायी मार्ग सुचवले आहेत, ताम्हिणी घाट, माळशेज घाट मार्ग वापरा.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर (एक्सप्रेसवे) आडोशी बोगद्याजवळ मंगळवारी सायंकाळी ५ वाजता झालेल्या भीषण अपघातामुळे लाखो प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. पुण्याकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या प्रोफोलीन या ज्वलनशील गॅसने भरलेल्या टँकरला चालकाचे नियंत्रण सुटले आणि तो पलटी झाला. अपघातानंतर टँकरमधून गॅसची गळती सुरू झाल्याने सुरक्षिततेच्या कारणास्तव महामार्गावरील वाहतूक तात्काळ थांबवण्यात आली. यामुळे दोन्ही दिशेने १५ ते २० किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

अग्निशमन दल, पोलिस आणि कंपनीचे तज्ज्ञ इंजिनिअर्स घटनास्थळी दाखल झाले असून, गॅस गळती पूर्णपणे थांबवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. गॅस हवेत वेगाने पसरत असल्याने परिसरातील वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. सद्यस्थितीत मुंबईकडे जाणारी एक लेन आणि पुण्याकडे जाणाऱ्या दोन लेनवर संथ गतीने वाहतूक चालू आहे. मात्र, जुना मुंबई-पुणे महामार्ग (एनएच-४८) देखील एक्सप्रेसवेवरून वळलेल्या वाहनांमुळे पूर्णपणे जाम झाला आहे.

प्रशासनाने प्रवाशांना लोणावळा घाट टाळण्याचा सल्ला दिला असून, पर्यायी मार्ग सुचवले आहेत. ताम्हिणी घाट मार्गे पुणे-पौड-मुळशी-ताम्हिणी घाट-माणगाव-इंदापूर-पेण-मुंबई असा पर्याय निवडता येईल, जो थोडा लांब असला तरी विनाअडथळा आहे. कल्याण-ठाण्यासाठी पुणे-चाकण-राजगुरुनगर-नारायणगाव-माळशेज घाट-मुरबाड-कल्याण मार्ग उपयुक्त ठरेल. उत्तर मुंबई किंवा पालघरला जाणाऱ्यांनी पुणे-मंचर-जुन्नरमार्गे माळशेज घाटाकडे वळावे.

प्रशासनाकडून महत्त्वाच्या सूचना जारी केल्या आहेत. गॅस गळती असलेल्या परिसरातून जाताना कारच्या काचा बंद ठेवा आणि एसी इंटरनल सर्कुलेशन मोडवर चालवा. इंधन टाकी पूर्ण भरून घ्या, कारण प्रवास ३ ते ६ तासांनी वाढू शकतो. पाणी, कोरडा खाऊ सोबत ठेवा, कारण पर्यायी मार्गावर सुविधा मर्यादित आहेत. अवजड वाहनांना फूड मॉल्स किंवा महामार्ग कडेला पार्क करण्याचे आदेश आहेत.

सध्याच्या परिस्थितीत रस्ते प्रवास अनिश्चित असल्याने पुणे-मुंबई दरम्यान रेल्वेचा अवलंब करावा. डेक्कन क्वीन, सिंहगड एक्सप्रेस, इंटरसिटी आणि प्रगती एक्सप्रेस या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल नाही. अपघातस्थळावरील कार्यवाही पूर्ण होईपर्यंत सतर्क राहा आणि ट्रॅफिक अपडेट्स तपासा, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com