BJP Leadership: “आजपासून हेच माझे नवे बॉस” भाजप राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींची गौरवपूर्ण मोहोर
जनसंघाच्या स्थापनेला 75 वर्ष पूर्ण होत असताना भारतीय जनता पक्षाने नव्या नेतृत्वाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. नितीन नबीन यांची भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले विधान सध्या राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे. “मी आजही भाजपचा कार्यकर्ता आहे आणि आजपासून नितीन नबीन हेच माझे बॉस आहेत,” असे जाहीरपणे सांगत मोदींनी पक्षातील कार्यकर्ता संस्कृती अधोरेखित केली.
पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात जनसंघाच्या 75 वर्षांच्या प्रवासाला अभिवादन करून केली. “लक्षावधी कार्यकर्त्यांचा त्याग, तपस्या आणि बलिदान यामुळेच जनसंघाचा वटवृक्ष उभा राहिला आणि त्यातूनच आजचा भाजप जन्माला आला. आज भाजप हा जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष आहे,” असे सांगत त्यांनी पक्षाच्या वैचारिक परंपरेवर भर दिला.
स्वतःच्या राजकीय प्रवासाचा उल्लेख करताना मोदी म्हणाले की, देशाचे पंतप्रधान होणे, तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची जबाबदारी मिळणे, कमी वयात मुख्यमंत्री होणे किंवा 25 वर्षे सरकारचे नेतृत्व करणे या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या असल्या, तरी “माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा अभिमान म्हणजे मी भाजपचा कार्यकर्ता आहे,” असे ठामपणे त्यांनी सांगितले. “आज नितीन नबीन हे आपल्या सर्वांचे अध्यक्ष आहेत आणि त्यामुळे ते माझेही बॉस आहेत,” या वाक्याला उपस्थितांकडून मोठा प्रतिसाद मिळाला.
नव्या अध्यक्षपदाच्या जबाबदारीबाबत बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, नितीन नबीन यांच्यावर केवळ भाजपचे संघटन सांभाळण्याची जबाबदारी नाही, तर एनडीएतील सर्व सहकारी पक्षांमध्ये समन्वय राखण्याचीही मोठी जबाबदारी आहे. “नितीन नबीन यांच्या संपर्कात जो येतो, तो त्यांच्या साधेपणा, सरळपणा आणि सहजतेची आवर्जून चर्चा करतो,” असे सांगत त्यांनी त्यांच्या नेतृत्वगुणांचे कौतुक केले.
भाजप युवा मोर्चाचे नेतृत्व, विविध राज्यांचे प्रभारी म्हणून काम, तसेच बिहार सरकारमधील प्रशासकीय अनुभव या सगळ्या जबाबदाऱ्यांमधून नितीन नबीन यांनी स्वतःला सिद्ध केल्याचे मोदींनी नमूद केले. “ज्यांनी त्यांना जबाबदारी दिली, त्यांनाही त्यांच्या कार्याचा अभिमान वाटला आहे,” असे म्हणत त्यांनी नबीन यांच्या कामगिरीवर शिक्कामोर्तब केले.
21 व्या शतकावर भाष्य करताना मोदी म्हणाले की, या शतकातील पहिली 25 वर्षे पूर्ण झाली असून येणारी 25 वर्षे भारतासाठी निर्णायक ठरणार आहेत. “हा तो काळ असेल, जेव्हा विकसित भारताचे स्वप्न साकार होईल,” असा विश्वास व्यक्त करत त्यांनी सांगितले की, याच महत्त्वाच्या कालखंडाच्या सुरुवातीला नितीन नबीन भाजपचा वैचारिक वारसा पुढे घेऊन जातील.
नितीन नबीन यांच्या पिढीबद्दल बोलताना मोदी म्हणाले की, ते ‘मिलेनियल’ पिढीचे प्रतिनिधी आहेत. “ज्या पिढीने रेडिओवर सूचना ऐकल्या आणि आज एआयचा वापर करते, त्या पिढीचे नेतृत्व नितीनजी करतात. त्यांच्याकडे ऊर्जा आहे, संघटनात्मक अनुभव आहे आणि तो अनुभव पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी निश्चितच उपयोगी ठरेल,” असे त्यांनी सांगितले.
भाषणाच्या शेवटी पंतप्रधान मोदींनी भाजपच्या वैचारिक सातत्यावर भर दिला. “आमच्याकडे अध्यक्ष बदलतात, नेतृत्व बदलते, पण आदर्श बदलत नाहीत. दिशा कधीच बदलत नाही. भाजप हा केवळ पक्ष नाही, तो एक संस्कार आहे, एक परिवार आहे. आमच्याकडे मेंबरशिपपेक्षा रिलेशनशिपला महत्त्व असते,” असे म्हणत त्यांनी भाजपच्या कार्यपद्धतीचे दर्शन घडवले.
नितीन नबीन यांच्या अध्यक्षपदी निवडीसोबतच पंतप्रधान मोदींच्या या विधानांमुळे भाजपमधील कार्यकर्ता-केंद्रित संस्कृती पुन्हा एकदा अधोरेखित झाली असून, येणाऱ्या काळात पक्ष आणि एनडीएची दिशा काय असेल, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे.
