राज्यपालांच्या विधानाचा निषेध, काँग्रेसतर्फे उद्या मुंबईत आंदोलन
मुंबईमधून गुजराती आणि राजस्थानी लोक गेल्यावर मुंबई ही आर्थिक राजधानी राहणार नाही, मुंबईमध्ये पैसाच राहणार नाही असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( Governor Bhagat Singh Koshyari ) यांनी वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर आता नव्या वादाला तोंड फुटल आहे. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीसह सर्वच पक्षांनी राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध करत तीव्र संताप व्यक्त केला आहे. राज्यपाल हटाव, कोश्यारी माफी मागा, अशी मागणी करत राज्यात ठिकठिकाणी उर्त्स्फूतपणे राज्यपालांच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आली. याचपार्श्वभूमीवर उद्या (5 ऑगस्ट ) काँग्रेसतर्फे मुंबईत आंदोलन केलं जाणार आहे. सकाळी 10:30 वाजता हे आंदोलन हँगिंग गार्डन ते राजभवन पर्यंत असणार आहे. राज्यपाल यांच्या विधानाचा निषेध केला जाणार आहे.
दरम्यान मुंबई, ठाण्यासह अखंड महाराष्ट्र मराठी माणसांनी घडवला आहे. सर्वांना सोबत घेऊन जाण्याची महाराष्ट्राची संस्कृती, इतिहास आहे. महाराष्ट्र एकसंध, एकजूट आहे. राज्यपालांनी अनावश्यक वाद निर्माण करू नये. महाराष्ट्राविना राष्ट्रगाडा न चाले हे लक्षात ठेवावे. ‘खरा वीर वैरी पराधीनतेचा, महाराष्ट्र आधार या राष्ट्राचा’ असे ट्विट विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले आहे.
मराठी माणसाला डिवचू नका – राज ठाकरे
महाराष्ट्रात मराठी माणसाने येथील मनं व जमीन मशागत करून ठेवल्यामुळेच तर इतर राज्यांतील लोक येथे व्यवसाय करायला आले आणि येत आहेत. दुसरीकडे त्यांना असे वातावरण मिळेल का? उगीच निवडणुकीच्या तोंडावर कुणी काही तरी सांगितले म्हणून बोलून वातावरण गढूळ करू नका. तुम्ही हे का बोलताय हे न कळण्याइतके आम्ही दुधखुळे नाहीत. मराठी माणसाला डिवचू नका, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यपालांना दिला आहे.
कोश्यारींना हटवून सुयोग्य व्यक्तीची नियुक्ती करा – संभाजीराजे
राज्यपालांची जीभ वारंवार घसरत आहे. शिवरायांबद्दलचे वक्तव्य असो, महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल पातळी सोडून बोलणे असो अथवा मुंबईबद्दल वक्तव्य करून मराठी माणसाची अस्मिता दुखावणे असो, कोश्यारी हे राज्यपाल पदाचीच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राची प्रतिमा डागाळत आहेत. राष्ट्रपती व पंतप्रधानांनी या विषयात तत्काळ लक्ष घालून महाराष्ट्राच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक परंपरेचे भान असणारा व त्याबद्दल आदर असणाऱया एखाद्या सुयोग्य व्यक्तीची महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करावी, अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी ट्विटच्या माध्यमातून केली आहे.

